सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला शुक्रवारी खंडणी स्वीकारताना पोलिसांनी अटक केली. गोरेंकडे या महिलेने आरोप न करण्याबद्दल तीन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यामधील १ कोटीची रक्कम घेताना महिलेला पोलिसांनी अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणात शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांनाही सायंकाळी अटक करण्यात आली.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी या महिलेने गंभीर आरोप केले होते. यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठले होते. या प्रकरणातील महिलेने आरोप न करण्याबद्दल तीन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याबाबत गोरे यांनी विराज रतनसिंह शिंदे (रा. वाई) यांच्यामार्फत सातारा गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार नोंदवली. १ कोटी रुपये संबंधित महिलेच्या वकिलाच्या कार्यालयात स्वीकारण्याचे शुक्रवारी ठरले. या वेळी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी सापळा लावत ही रक्कम स्वीकारताना संबंधित महिलेला अटक केली, अशी माहिती सातारा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी दिली.