लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची बाब समोर आली आहे. याबाबत मुंबई पोलीसांच्या सायबर शाखेकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. आदिती तटकरे यांनीच समाजमाध्यमांवर या संदर्भातील माहिती दिली.
एखाद्याचे फेसबुक अकाऊंट हॅक करून नंतर मित्र परिवाराला पैसे मागण्याच्या घटना अनेकदा घडतात. सुपरीचीत व्यक्तींचे फोटो वापरून त्यांचे बनावाट खाते तयार करण्याचे प्रकार अलिकडच्या काळात सातत्याने समोर येत आहेत. या हॅकींगचा फटका गुरुवारी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना बसला. त्यांचे फेसबुकवरील अधिकृत अकाऊंट हॅकर्सनी हॅक केल्याची बाब समोर आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आदिती तटकरे यांच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. त्यावर उलट सुलट प्रतिक्रीया पडण्यास सुरुवात झाली.
ही बाब लक्षात येताच आदिती तटकरे यांनी समाजमाध्यमांवर आपल्या फॉलोअर्सला या संदर्भात पोस्ट टाकत आपले अकाऊंट हँक झाले असल्याची माहिती दिली. तसेच आक्षेपार्ह पोस्टवर प्रतिक्रीया व्यक्त करू नका असे आवाहन त्यांनी आपल्या फोलोअर्सला केले. याबाबत अज्ञात हॅकर्स विरोधात पोलीसांकडे तक्रार नोंदवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.