सांगली: महिलाच महिलांच्या वैरी आहेत. महिलांनीच वंशाचा दिवा, वैधव्य याबाबतचे आपले विचार बदलण्याची गरज आहे असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी सांगलीत व्यक्त केले.
महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जनसुनावणीसाठी श्रीमती चाकणकर या सांगली दौर्यावर आल्या होत्या. महिला तक्रारकर्त्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात बैठकही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक बसवराज तेली आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आणखी वाचा-“…तर ही चांगली संधी आहे”, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना टोला; मंत्रीपदाचा उल्लेख करत म्हणाल्या…
यावेळी बोलताना श्रीमती चाकणकर यांनी महिलांशी संवाद साधत असताना सांगितले, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी अपार कष्ट, मानहान सहन केली. यामुळेच अनेक महिला आज अधिकारी पदावर विराजमान झाल्याचे दिसते. मात्र, आजही समाजात महिलाच महिलांचा दुस्वास करते, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलींची लग्ने केली जातात. यामध्ये बदल करण्याचे काम महिलाच करू शकते. महिलावर होत असलेल्या अत्याचारात केवळ पुरूषांनाच दोष देता येणार नाही. तर कालबाह्य अनिष्ट रूढींचा आपण त्याग करायला हवा. बदलत्या काळानुरूप महिलांनी वास्तव स्वीकारण्याची गरज आहे.
यावेळी अनेक महिलांनी आपली गार्हाणी मांडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र, शिस्तच नसल्याने नेमके काय म्हणणे आहे हेही आयोगाच्या अध्यक्षांना ऐकता आले नाही. जनसुनावणीवेळी महिलांची गर्दी होउ नये यासाठी पिडीतांना शिस्त न लावता केवळ राजकीय कारणातून अनुचित प्रकार घडू नये यासाठी महिला पोलीसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.