गोंदिया : सालेकसा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पांडे यांना मारहाण केलेल्या लिपिक वर्षां वाढई यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांतील वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्यानंतर दिवाळीच्या पूर्वसंध्येला महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. याबाबतची तक्रार वरिष्ठांकडे केल्यावर ना करण्यात आली. प्रकरणाची चौकशी करून उपविभागीय अधिकारी देवरी यांनी चौकशी करून वर्षां वाढई यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुढील कारवाईस पात्र ठरवले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १३ नोव्हेंबर रोजी वाढई यांना निलंबित केले आहे.
सालेकसा तहसील कार्यालयातील कार्यरत नायब तहसीलदार आय. आर. पांडे यांच्याशी कार्यरत लिपिक वर्षां वाढई यांचे भांडण झाले. त्यातून नायब तहसीलदाराला मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. यानुरूप उपविभागीय देवरी यांच्याकडे प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली. चौकशीत वर्षां वाढई यांच्यावर कर्तव्यात कसूर करणे, सोपवलेली जबाबदारी योग्यरित्या पार न पाडणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मारहाण करणे असे आरोप ठेवले होते. तसेच वाढई यांनी लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान अधिकारी राठोड यांना देखील मारहाण केली होती.
हे सर्व प्रकार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी १२ नोव्हेंबरपासून पुढील आदेशापर्यंत वर्षां वाढई यांना निलंबित केले आहे. निलंबित कार्यकाळात त्यांची बदली तहसील कार्यालय देवरी येथे करण्यात आली. त्याचप्रमाणे घडलेल्या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.