राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील पक्षाच्या मेळाव्यात राम मांसाहारी होता, असे वक्तव्य केले. त्यानंतर राज्यभरात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपा, शिवसेना शिंदे गटाकडून याचा प्रखर विरोध करण्यात आला आहे, तसेच आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशीही काहींनी मागणी केली आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही यावर भाष्य केले आहे. एक्स या सोशल मिडिया साईटवर पोस्ट टाकून रुपाली चाकणकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच महराष्ट्र शांत असून तो शांतच असू द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हे वाचा >> “आव्हाडांचे ते विधान शरद पवारांसमोर याचा अर्थ…”, संजय शिरसाट यांचा थेट पवारांवर आरोप
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
रुपाली चाकणकर आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, “साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिर्डी मधील शिबिरात विचारांची ज्योत पेटवायची सोडून धार्मिक विखारांनी आग लावण्याचे काम जितेंद्र आव्हाडांनी केले. ज्या पवित्र भूमीत सर्व धर्मातील भाविक दर्शनाला येतात. त्या ठिकाणी दळभद्री इतिहास सांगून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम केले आहे. मागे पोपटपंची करताना हेच महाशय म्हणाले होते “हे वर्ष दंगलींचं वर्ष असेल.” त्या वाक्याला खरं करण्यासाठी तर हा आटापिटा सुरू नाही ना ? महाराष्ट्र शांत आहे, शांतच राहू द्या.”
“लोकांना प्रभू श्रीरामबद्दल प्रेम आहे, त्यामुळे मुद्दाम बोलून लोकांच्या भावना भडकवण्याचे राजकारण बंद करा. उद्या महाराष्ट्रात काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन या महाशयांवर कठोर कारवाई करावी”, अशीही मागणी रुपाली चाकणकर यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले आहे. या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलत असताना एक वादग्रस्त विधान केले आहे. “राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला होता. त्यावर आता चहुबाजूंनी टीका होत आहे.