सांगली : पोलीस ठाण्याचा संपूर्ण कार्यभार महिलांच्या हाती, परिचारिकांचा सन्मान, महिलांची पदयात्रा अशा विविध उपक्रमांनी शनिवारी सांगलीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारापासून रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणापर्यंतची सर्व जबाबदारी आज महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात ठाणा प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्यातील आजच्या दिवसाची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, महिला सहायक उपनिरीक्षक माया चव्हाण, हवालदार रंजना बेडगे, साक्षी पतंगे, रंजना कलगुटगी, महिला शिपाई सीमा यादव, उज्ज्वल बाडगी, महादेवी माने, स्वप्नाली निकम यांनी आजच्या कामकाजाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. यामध्ये ठाणे अंमलदार, सीसीएटीएनएस प्रणाली, दूरसंदेश यंत्रणा, कोठडी विभाग, गस्त पथक, वाहतूक नियंत्रण आदी वेगवेगळ्या विभागातील काम समर्थपणे पार पाडले. सांगली-मिरज मुख्य मार्गावर उभे राहून महिलांनी भर उन्हात वाहन व वाहनचालकांची तपासणीही केली.
महापालिकेच्यावतीने महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची आज शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या नियंत्रणाखाली उपायुक्त विजया यादव यांच्या नेतृत्वाखाली महिलांची पदयात्रा कर्मवीर चौकातून काढण्यात आली. या पदयात्रेची सांगता महापालिकेच्या प्रधान कार्यालयाजवळ करण्यात आली. मुख्यालयात केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.वृषाली अभ्यंकर, स्मिता वाघमोडे, डॉ. शीतल धनवडे, ज्योती सरवदे आदींनी या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संवेदना शुश्रूषा केंद्रामधील परिचारिकांचा प्रा. सुभाष आरवाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरवाडे फाऊंडेशनच्यावतीने संवेदना शुश्रूषा केंद्रासाठी या वेळी रुग्णोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. या वेळी प्रा. शोभा आरवाडे, सोनिया आरवाडे, विनायक पाटी, भूषण गवळी, सुनील चरापले आदी उपस्थित होते. डॉ. दिलीप शिंदे यांनी स्वागत तर डॉ. नीलिमा शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे संयोजन आदित्य आपटे, माधुरी कुमरे, काजल कदम, श्रुती पाटील यांनी केले होते.