वाई तालुक्यातील एका ५७ वर्षीय महिलेला अचानक धाप लागू लागल्याने तिच्या कुटुंबियाने तिला उपचारासाठी वाई येथील रुग्णालयात दाखल केले. तेथून प्राणवायू पातळी कमी झाल्याने शनिवारी रात्रीच तिला पुढील उपचारासाठी साताऱ्यात आणले. बेड कुठे मिळेल म्हणून शोधशोध केली.
जंबो कोविड रुग्णालयाच्या दारात रुग्णवाहिका आणण्यात आली. तेथे रुग्णालय व्यवस्थापनाने बेड उपलब्ध नसल्याने प्रवेश दिला नाही. दारातच तब्बल पाच तास थांबल्याने त्या महिलेचा सांयकाळी मृत्यू झाला. नातेवाईकांनी याची कल्पना रुग्णालयांतील व्यवस्थापनाशी दिली. त्यावरुन नातेवाईकांना ईसीजी वगैरे सांगत वेळ काढला. यामुळे नातेवाईक संतप्त झाले.
तसेच डॉक्टरांनी तपासणी करुन पुढचा अहवाल येईपर्यंत थांबण्यास सांगितले. त्यावरुन तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.या गोंधळात महिलेचा उपचाराभावी सातारा जिल्हा जंबो कोविड रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला. “जागा मिळेल थांबा असे एक कर्मचारी सांगत होता.उशिरा आलेल्या रुग्णांना उपचारासाठी आत घेतले जात होते परंतु दारात उपचारासाठी थांबलेल्या रुग्णाला प्रवेश न मिळता रुग्णांची भरती ही चक्क वशिलेबाजीने सुरु होती. त्यामुळे आम्हाला दुर्देवाने वाटच पहावी लागली त्यातच आमच्या रुग्ण जीवंत राहिला नाही”, असा उद्वेग त्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तर, रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.