संदीप आचार्य
मुंबई कोरोनामुळे रूग्णालयात वाढलेले काम, लॉकडाऊनची बंधने, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि मुलांचे संगोपन अशा वेगवेगळ्या पातळीवर लढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील महिलांसाठीचा हा काळ अतिशय आव्हानात्मक होता. कारण वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला डॉक्टर व परिचारिका यांच्यावर लॉकडाऊनच्या काळात एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या वाढल्या होत्या तर दुसरीकडे रुग्णसेवेचा सामना करावा लागत होता. करोनाच्या पहिल्या टप्प्यात कुटुंबाचं संरक्षण आणि डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य या दुहेरी आव्हानात्मक स्थितीत तारेवरची मोठी कसरत करावी लागल्याचे महिला डॉक्टर व परिचारिकांनी सांगितले. ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कोरोनाच्या गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत कुटुंब व रुग्णालय या दोन्ही पातळीवर मोठ्या मानसिक तणावांना सामोरे जावे लागल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील बहुतेक महिलांनी सांगितले.
करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी उपचाराच्या दिशेपासून अनेक प्रश्न होते. मोठ्या प्रमाणात मृत्यू होत होते. डॉक्टर व आरोग्यसेवकांमध्येही एक भिती होती.अशावेळी आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला डॉक्टर व परिचारिकांनी हिम्मतीने चोख रुग्णसेवा बजावली. यातील काही महिला डॉक्टर व परिचारिकांच्या घरी लहान मुले होती तसेच वृद्ध मंडळी होती. आपल्यामुळे घरच्यांना करोनाची लागण तर होणार नाही ना, ही एक अनामिक भिती त्यांच्यामध्ये होती. त्यावेळच्या मानसिक ताणाची कल्पना करणेही अवघड असल्याचे आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे यांनी सांगितले. आठ आठ तास पीपीई किट घालून काम करणे हे जसे कठीण तसेच अनेकदा पीपीई किट तसेच अन्य सामग्री नसतानाही खासकरून महिला डॉक्टरांनी जी रुग्णसेवा केली त्याची कल्पनाही करणे कठीण आहे, असेही डॉ साधना तायडे यांनी सांगितले.
कोरोनाचा काळ हा सर्वांसाठी मोठे आव्हान होते. अत्यंत मर्य़ादित साधनासह कठिण वातावरणात काम करणं खूप अवघड होतं. त्यात कोरोना संसर्गाची भिती सतत मनात असायची. मुळात, अशी परिस्थितीत कधी ओढावेल असे वाटतचं नव्हतं. सुरूवातीला काहीच कल्पना नसल्याने खूप गोंधळ उडाला होता. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना रूग्णांवर उपचार करण्यासह कुटुंबियातील सदस्यांना धीर देणं हे मोठं आव्हान होतं. कारण रूग्णालयात काम करत असताना कुटुंबातील सदस्यांना नेहमी काळजी लागून राहत होती. अशा स्थितीत दोन्ही बाजू सांभाळणं खूपच अवघड होत होतं. रुग्णालय हे देखील माझ्यासाठी एक कुटुंब आहे. दोघांपैकी एकाची निवड करणं, अशा स्थितीत डॉक्टर म्हणून खूपच कठिण होतं. परंतु, या सर्व कठिण परिस्थितीत मला कुटुंबियांनी खूप साथ दिली. केवळ कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच या कठिण काळाला सामोरे जाण्याची ताकद मला मिळाल्याचे वा़डीया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.
करोना काळात केवळ कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे मी जंबो कोविड सेंटरमध्ये काम करू शकले. साधारणतः २३ महिने मी जंबो कोविड सेंटरमध्ये काम केले. पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान रूग्णांची संख्या वाढत असल्याने कामाचा प्रचंड ताण होता. दिवसभर १२ ते १४ तास काम करावे लागत होते. कुटुंबियांच्या सहकार्यामुळे मला रूग्णसेवा करता आली. या कामाच्या ताणामुळे मला माझ्या मुलीचा वाढदिवसही लक्षात राहिला नव्हता. कोविड काळातच माझी मोठी मुलगी सुद्धा नायर डेंटलमध्ये ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणून नियुक्त झाली होती. तिने सुद्धा नेस्कोमध्ये काम केले होते. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना जंबो सेंटर उभारणे, कर्मचारी व मनुष्यबळ मिळवणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि उपकरणं मिळवणे हे मोठे आव्हान होते. याशिवाय १,८०० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळाचे व्यवस्थापन करणे, रूग्णांच्या नातेवाईकांना अपडेट देणं, वेळेत बिले आणि पगार दिले, मीडिया व्यवस्थापन करणं अशी सर्व परिस्थितीत या कालावधीत हाताळावी लागली. माझे कुटुंब हेच माझे सामर्थ्य आहे आणि त्यामुळेच मी अनेक तणावपूर्ण प्रसंग हाताळू शकले असे पालिकेच्या नेस्को जंबो कोविड रूग्णालयाच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.
करोनाच्या काळात शस्त्रक्रिया बंद असल्या तरी रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. करोनाच्या पहिल्या लाटेत संसर्गाचा धोका सर्वांधिक होता. तेव्हा लस उपलब्ध नसल्याने आम्ही अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना गमावले. तो काळ अत्यंत कठिण होता. डॉक्टर म्हणून काम करताना रूग्णसेवेसह कुटुंबातील सदस्यांना संसर्गाची लागण होण्यापासून वाचवणं असे दुहेरी आव्हान होतं. मला मुलाच्या जवळ जायलाही भिती वाटायची. त्यात लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने मुलं घरीच असायची. अशा स्थिती मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं होतं. पण काम आणि मुलाची जबाबदारी सांभाळणं खूपच अवघड होतं होतं.अशा स्थितीत माझ्या पतीनं खूप साथ दिली. मुलाचा ऑनलाईन अभ्यास असल्याने मुलाची आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. पतीच्या सहकार्यामुळेच या अवघड परिस्थितीचा सामना करण्याचं बळ मला मिळालं. अशी स्थिती पुन्हा कधीच उद्भवू नये, हीच देवाकडे प्रार्थना असल्याचे अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील लेप्रोस्कोपिक अँण्ड बॅरिअँटिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले.