महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत एक गुण मिळालेल्या महिला मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्या असून खुल्या प्रवर्गापेक्षाही मागासवर्गीयांचा ‘कट ऑफ’ जास्त आहे, हे विशेष. केवळ महिलांचाच ‘कट ऑफ’ नाही, तर इतर सर्वच प्रवर्गाचा कट ऑफ दिवसेंदिवस निचांक गाठत चालला असून उद्या, केवळ आयोगाच्या परीक्षेचा अर्ज भरणारा उमेदवारही उत्तीर्ण होईल की काय, अशी शंका या निमित्ताने निर्माण झाली आहे. आयोगातर्फे घेतली जाणारी परीक्षा विद्यार्थ्यांना समजत नाही की उमेदवारच निर्बुद्ध आहेत, असे महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आकडेवारीवरून वाटू लागते. वर्ग ‘ब’ गटातील अराजपत्रित अधिकारी ५० टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होत असताना वर्ग ‘अ’ गटातील अधिकाऱ्याला खुल्या प्रवर्गात एक गुण जरी मिळाला तरी उत्तीर्ण, हा एमपीएससीचा निकष प्रथम हास्यास्पद वाटत असला तरी तो चिंतनीय आहे.
आयोगातर्फे २७ एप्रिलला महाराष्ट्र वनसेवेंतर्गत सहायक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल या अनुक्रमे १० आणि २७२ पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. त्याचा निकाल २० ऑगस्टला लावला. त्यानंतर २१ ऑगस्टला आयोगाने मुख्य परीक्षेसंबंधीची घोषणा करताना मुख्य परीक्षेला निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण १:१० (एका पदास दहा उमेदवार) असे घोषित केले होते. त्या विरोधात उमेदवार न्यायालयात गेले. इतर परीक्षांना १:२० असे प्रमाण असताना याच परीक्षेत १:१० असा नियम का, असे प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आले.
न्यायालयाने ते मान्य करून १:२० हेच गुणोत्तर योग्य ठरवले. त्यानुसार आयोगाला एका पदामागे २० विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडणे भाग पडले. मात्र, याचा परिणाम असा झाला की, आयोगाचा कट ऑफ एकवर आला. म्हणजे, खुल्या प्रवर्गातील महिलेला किंवा क्रीडापटूंना एक गुण असला तरी ते मुख्य परीक्षेला पात्र ठरले आहेत. आश्चर्य म्हणजे, अनुसूचित जाती प्रवर्गात महिलांचा कट ऑफ १७, अनुसूचित जमातीत १२, डीटी (अ)मध्ये २४, एनटी (ब) मध्ये ९, विशेष मागास वर्गासाठी (एसबीसी) १९, एनटी (सी) २४ आणि इतर मागासवर्गासाठी २१ आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा