आधुनिक मराठी नाटकांमधील स्त्री प्रतिमांबाबत आशादायी चित्र असून अनेक नाटककारांनी आपल्या कलाकृतींतून त्यांच्या भूमिकांना न्याय दिला असल्याचे मत प्रा. डॉ. मधुरा कोराने यांनी व्यक्त केले. येथील यशवंतराव महाराज पटांगणात आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘आधुनिक मराठी नाटकातील स्त्री प्रतिमा’ या विषयावर त्या बोलत होत्या. आधुनिक मराठी नाटकांमध्ये स्त्री प्रतिमा दाखविताना त्यांच्या वेदना, प्रश्न, समस्या आदींना वाट करून दिल्याने स्त्रियांना अभिव्यक्त होण्याचे हक्काचे माध्यम मिळाल्याचे डॉ. कोराने यांनी नमूद केले. साहित्याचा विचार केला तर नाटककारांवर रूढी व परंपरेचा पगडा जाणवतो. तो समाजाचा भाग असल्याने नाटककारांनी काळासोबत चालण्याचे काम केले आहे. नाटक हे नेहमी काळानुसार स्त्रियांच्या प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न करते. ‘चारचौघी’ नाटकातून स्त्रीची अंतर्मूख करणारी प्रतिमा दाखविण्यात आली, तर ‘चाहूल’ नाटकातून घरातून स्त्रीला पाठिंबा मिळाल्यास ती अस्तित्व कसे सिद्ध करून दाखविते याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ‘आई रिटायर्ड होते’मधून स्त्रियांनी जबाबदारीतून अंग काढून घेतल्यास इतरांची कशी अवस्था होते, हे दाखविले आहे. ‘नातीगोती’मध्ये मतिमंद मुलांचे संगोपन करतांना स्त्रीला कशा परिस्थितीला तोंड द्यावे लागते, हे मांडण्यात आल्याचा उल्लेख डॉ. कोरान्न्ो यांनी केला.
मूल नसताना तिच्या मनाची होणारी घालमेल ‘ध्यानीमनी’मधून, तर सासू-सुनेच्या नात्याची ओळख ‘माझं घर’ नाटकाद्वारे करून देण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader