क्रीडा महोत्सवातील साखळी सामन्यांस सुरुवात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर २१ व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आज मोठय़ा जल्लोषात उद्घाटन झाल्यानंतर दुपारच्या सत्रात क्रीडा संघर्षांह्णला सुरूवात झाली. यामध्ये महिला कबड्डीच्या साखळी सामन्यात मुंबई विद्यापीठाच्या संघाला एसएनडी विद्यापीठाने दिलेली कडवी झुंज क्रीडारसिकांसाठी यादगार ठरली. तसेच व्हॉलिबॉलमधील पुणे विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाच्या महिला संघाला लीलया नमवत जेतेपदावरचा दावा भक्कम केला.

व्हॉलिबॉलमध्ये पुरूषांच्या सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), राहुरी कृषी विद्यापीठ, आणि मुंबई विद्यापीठ विजयी ठरले. तर महिला गटात पुणे विद्यापीठासह परभणी कृषी विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या संघाने साखळी सामन्यात विजयाने सुरूवात केली. कबड्डीमध्ये पुरूष गटात सर्वच सामने एकतर्फी झाले. यामध्ये मुंबई विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाने साखळी सामन्यात विजयी सलामी दिली. या स्पध्रेत महिला गटात मातब्बर मुंबई विद्यापीठ संघाला एसएनडीटी विद्यापीठाने जोरदार आव्हान दिले होते. मात्र शेवटच्या पाच मिनिटात मुंबईच्या संघाने लक्षवेधी खेळ करत एसएनडीटीची कडवी झुंज परतावून लावली. यावेळी मुंबईसह मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ, आणि पुणे विद्यापीठ यांनी आपापले साखळी सामने जिंकले.

बास्केटबॉलमध्ये महिला गटातील पहिल्या साखळी सामन्यात सोलापूर, मुंबई, पुणे, गडचिरोली, कोल्हापूर या विद्यापीठांचे संघ सरस ठरले, तर पुरूष गटात नांदेड विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक), पुणे विद्यापीठ आणि परभणी कृषी विद्यापीठाचे संघ विजयी ठरले. या तिन्ही क्रीडाप्रकारांत प्रत्येक संघाला तीन ते चार साखळी सामने खेळावे लागणार आहेत.

दरम्यान, उद्घाटन सोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिक्षण मंत्री विनोद तावडे, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर अनुपस्थित राहिल्याने उद्घाटकाचा मान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मिळाला. अशा क्रीडा महोत्सवांच्या निमित्ताने अखंड महाराष्ट्राचे दर्शन घडते, असे प्रतिपादन करत त्यांनी भविष्यात या स्पध्रेत मल्लखांब आणि कुस्तीया क्रीडाप्रकारांचाही समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यावेळी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार संजय कदम, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तपस भट्टाचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women kabaddi sndt mumbai university