बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील मानोऱ्याच्या जंगलात जळावू काडय़ा आणण्यासाठी गेलेल्या झुबेदा शेख वारीस (४६) या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे मानोरा व परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील काही महिला आज पहाटे तीन किलोमीटर अंतरावरील जंगलात जळावू काडय़ा आणण्यासाठी गेल्या होत्या. काडय़ा गोळा करीत असतांनाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने झुबेदा शेख वारीस या महिलेवर अचानक हल्ला केला. डोळ्यासमोर वाघ दिसताच अन्य महिलांनी  गावाकडे पळ काढला, तर वाघाच्या तावडीत सापडलेल्या झुबेदाने सुटकेसाठी प्रयत्न केला. मात्र, वाघाने तिच्या नरडीचा घोट घेतला. यात झुबेदाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शी महिला गावाकडे पळत आल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावकरी लाठय़ाकाठय़ा घेऊन घटनास्थळी पोहोचले तेव्हा वाघ महिलेच्या मृतदेहाशेजारीच बसला होता. गावकरी त्याला जंगलात हाकलण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु वाघ बराच वेळ तेथेच बसून होता. काही वेळाने वाघ जंगलात निघून गेल्यावर गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मोरे, क्षेत्रपाल सदानंद लाटकर, आस्वले, वनरक्षक तिजारे, पठाण, वनरक्षण समितीचे अध्यक्ष महादेव देवतळे आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर मृत महिलेच्या मुलाला तातडीची आर्थिक मदत म्हणून २५ हजार रुपये दिले. दरम्यान, या घटनेमुळे मानोरा परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. मानोऱ्याच्या जंगलात प्रथमच वाघाने महिलेला ठार केल्याने गावकऱ्यांनी वाघाला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली आहे.

Story img Loader