बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील मानोऱ्याच्या जंगलात जळावू काडय़ा आणण्यासाठी गेलेल्या झुबेदा शेख वारीस (४६) या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे मानोरा व परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील काही महिला आज पहाटे तीन किलोमीटर अंतरावरील जंगलात जळावू काडय़ा आणण्यासाठी गेल्या होत्या. काडय़ा गोळा करीत असतांनाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने झुबेदा शेख वारीस या महिलेवर अचानक हल्ला केला. डोळ्यासमोर वाघ दिसताच अन्य महिलांनी गावाकडे पळ काढला, तर वाघाच्या तावडीत सापडलेल्या झुबेदाने सुटकेसाठी प्रयत्न केला. मात्र, वाघाने तिच्या नरडीचा घोट घेतला. यात झुबेदाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शी महिला गावाकडे पळत आल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावकरी लाठय़ाकाठय़ा घेऊन घटनास्थळी पोहोचले तेव्हा वाघ महिलेच्या मृतदेहाशेजारीच बसला होता. गावकरी त्याला जंगलात हाकलण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु वाघ बराच वेळ तेथेच बसून होता. काही वेळाने वाघ जंगलात निघून गेल्यावर गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मोरे, क्षेत्रपाल सदानंद लाटकर, आस्वले, वनरक्षक तिजारे, पठाण, वनरक्षण समितीचे अध्यक्ष महादेव देवतळे आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर मृत महिलेच्या मुलाला तातडीची आर्थिक मदत म्हणून २५ हजार रुपये दिले. दरम्यान, या घटनेमुळे मानोरा परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. मानोऱ्याच्या जंगलात प्रथमच वाघाने महिलेला ठार केल्याने गावकऱ्यांनी वाघाला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली आहे.
बल्लारपूरजवळच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील मानोऱ्याच्या जंगलात जळावू काडय़ा आणण्यासाठी गेलेल्या झुबेदा शेख वारीस (४६) या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-06-2014 at 06:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women killed in tiger attack