महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत मंगळवारी मांडलं गेलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. अशाच सोनिया गांधी यांनीही आपली भूमिका मांडली आहे. महिला आरक्षण विधेयक हे माझे पती राजीव गांधी यांचं स्वप्न होतं. हे सरकारने आता लवकारत लवकर पूर्ण करावं असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. तसंच इतरही खासदार आणि महिला खासदार आपल्या भूमिका लोकसभेत मांडत आहेत. अशातच सुप्रिया सुळेंनी माझ्यासारख्या महिलांना आरक्षण नको असं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मी जेव्हा संसदेत निवडून आले तो क्षण मला आजही आठवतो आहे. आजही दोन महिला खासदार माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या म्हणजे वृंदा करात आणि सुषमा स्वराज. या विधेयकाचा सरकारला फायदा होईल की तोटा ते माहित नाही पण हा या सरकारचा जुमला आहे. फार विचार करायची गरज नाही. कारण निवडणुकीच्या अनुषंगाने हे बिल मोदी सरकारने आणलं आहे.
माझ्यासारख्या महिलांनी आरक्षण घेऊ नये
माझ्यासारख्या महिलांनी आरक्षण घेऊ नये या मताची मी आहे. मी कसं काय आरक्षण घेणार? कारण हे आरक्षण ज्या महिलांना संधी मिळत नाही त्यांच्यासाठी आहे. माझ्यासारख्या महिलांनी हेच काय कुठलंही आरक्षण मग ते मराठा असेल, ओबीसींचं असेल, धनगर, मुस्लिम असेल कुठलंही आरक्षण घेऊ नये. कारण ज्याला आरक्षण खरोखर गरजेचं आहे त्याला त्याचा फायदा होईल. आम्हाला शिक्षण मिळालं आहे आमच्या कुटुंबाने आम्हाला आमच्या पायावर उभं केलं आहे. त्यामुळे आम्ही आरक्षण घ्यायला नको. महिला आरक्षणाची अमलबजावणी झाली पाहिजे तेव्हा त्यावर बोलता येईल. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्रीपद मिळेल का?
कुठलंही जबाबदारीचं पद हे कर्तृत्वावर ठरतं. महिला किंवा पुरुष अशा निकषांवर ते ठरत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ती व्यक्ती व्हावी जी महाराष्ट्राची प्रगती करु शकेल. असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.