तालुक्यातील मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व्हरकटे यांच्या बेजबाबदारपणामुळे एका बाळाला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच जन्म घ्यावा लागला. दरवाजातच महिलेची प्रसूती झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने बाळ-बाळंतीण सुखरूप आहे. मात्र या बेजबाबदार अधिका-यास निलंबित करण्याची मागणी या महिलेच्या पतीने केली असून त्याला पाठीशी घातल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने गर्भवती मातांसाठी जननी शिशू सुरक्षा योजना सुरू केली आहे, मात्र या योजनेलाच मिरजगाव येथील वैद्यकीय अधिका-यांनी हरताळ फासला. या महिलेला केवळ उपचाराअभावी सरकारी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बाळाला जन्म द्यावा लागला. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे.
सुभाष सुद्रिक (राहणार रवळगाव) यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना याबाबत तक्रारअर्ज दिला आहे. दि. १ जूनला त्यांची पत्नी राणी हिला अचानक त्रास होऊ लागल्याने जवळच्या मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात फोन करून गाडी पाठवण्यासाठी विनंती केली. त्यानुसार आरोग्य केंद्राची गाडी रवळगाव येथे आली. मात्र रुग्णालयात येईपर्यंत राणी यांची प्रकृती अधिक बिघडली. त्या वेळी तिथे डय़ुटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी व्हरकटे यांनी तिला तपासून प्रकृती चिंताजनक असल्याने कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यासाठी गाडी मागितली असता त्यांनी स्पष्ट नकार दिला. खासगी गाडीने रुग्णाला घेऊन जा असा उफराटा सल्लाही त्यांनी दिला.
या गोंधळात राणी यांची प्रकृती फारच बिघडत होती. त्यांना असहय़ वेदना होत होत्या. मात्र नाइलाजाने नातेवाइकांनी तिला कर्जतला नेण्यासाठी या रुग्णालयातून बाहेर आणल्यानंतर काही क्षणात येथील प्रवेशद्वारातच तिची प्रसूती झाली. या प्रकाराने रुग्णासह नातेवाईकही हबकून गेले. त्यांची स्थिती अधिकच अवघडल्यासारखी झाली. जननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत कोठेही रुग्णालयाची गाडी देण्याचा नियम असताना व्हरकटे यांनी तो नियम पाळला नाही. अवघडलेल्या अवस्थेतील मातेला बाहेर पाठवले हे कर्तव्यात कसूर करणारे कृत्य आहे. सुदैवाने बाळ व मातेलाही इजा झाली नाही, मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन व्हरकटे यांना निलंबित करावे अशी मागणी सुद्रिक यांनी या अर्जात केली आहे.