युवती संघटनचा एक टप्पा यशस्वीपणे पार केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता ३५ वर्षांहून अधिक वयोगटांतील महिलांचे नव्याने संघटन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. ठिकठिकाणी युवती मेळाव्यांना मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील वर्षांत प्रत्येक जिल्ह्यात आता प्रामुख्याने महिला मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी अर्थातच खा. सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना वेगवेगळ्या माध्यमांतून खिंडीत गाठण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून होत असताना विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षाला धडा शिकविण्याची जय्यत तयारी यामार्फत राष्ट्रवादीने सुरू केल्याचे अधोरेखित होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर काँग्रेससह इतर सर्व राजकीय पक्ष त्या अनुषंगाने महिला वर्गात निवडणूकविषयक तयारी करण्याबाबत अद्याप जागरूक झाले नसताना राष्ट्रवादीने या संधीचे सोने करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. युवती मेळाव्यानंतर महिलांचे संघटन हा त्याचाच एक भाग. मुलींना सक्षम करण्याच्या उद्देशाने खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या राष्ट्रवादी युवती मंचचा महामेळावा गेल्याच महिन्यात औरंगाबाद येथे भव्यदिव्य स्वरूपात झाला. तत्पूर्वी, संपूर्ण राज्यात ४९ जिल्हावार युवती मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने १८ ते ३५ वयोगटातील हजारो युवतींना पक्षाशी जोडून घेण्यात आले. वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे युवतींचा एक मोठा गट पक्षाशी जोडला गेल्यावर पक्षाच्या धुरिणांनी आता या वयोगटाच्या पलीकडील महिलांचे संघटन करण्याचे ध्येय ठेवले आहे. राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून पक्षाची महिला आघाडी कार्यान्वित आहे. युवती मंचमार्फत या आघाडीचा प्रभाव भविष्यात वृद्धिंगत होणार आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी महिला आघाडीला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून संघटना बांधणीवर भर देण्यात आला आहे.
युवती मेळाव्यांना लक्षणीय प्रतिसाद मिळाल्याने ही कक्षा अधिक व्यापक करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. युवती मेळाव्यांच्या धर्तीवर, महिलांच्या जिल्हानिहाय मेळाव्यांचे जानेवारीपासून आयोजन केले जाणार आहे. या नियोजनाबद्दल कमालीची गोपनीयता बाळगली जात असून मित्रपक्ष काँग्रेसला जाग येऊ नये, याचीही पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या किमान दोन वर्षे आधीपासून राष्ट्रवादीने प्रथम युवतींचे आणि आता महिलांच्या संघटनाला महत्तम प्राधान्य देत या विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले आहे.  
ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मुद्दय़ावर गाफील राहिलेल्या काँग्रेससह विरोधकांना गारद करण्याच्या रणनीतीचा हा एक भाग म्हणता येईल. महिला मेळाव्यांचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सध्या वेगात सुरू असून लवकरच या संदर्भातील कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.