दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना रोजगाराबरोबरच आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असून, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
दापोली येथील आझाद मैदानात उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सरस २०२४-२५ चे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी फित कापून केले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी गृहराज्य मंत्री योगेश कदम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, राज्य शासनाने एका जिल्ह्यात दोन सरस प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदाच गणपतीपुळेनंतर दापोलीत सरस प्रदर्शन भरवण्याचा मान दापोली तालुक्याला मिळाला. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा दापोली तालुका आहे. या तालुक्यांमध्ये सुमारे आठ ते दहा लाख लोक दरवर्षी पर्यटनाच्या माध्यमातून येत असतात.
बचत गटाची उत्पादने चांगल्या प्रतीची असली पाहिजेत. इथे येणारा प्रत्येक माणूस बचत गटाची वस्तू खरेदी करेल. बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रांती घडून येईल. यापुढे रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात नंबर जिल्हा बनवण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न केले जातील, असे सांगून बचत गटाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री डाॕ. सामंत यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, महिला भगिनींनी सरसमध्ये दर्जेदार उत्पादने विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बचत गटाच्या स्टॉल समोर गर्दी असली पाहिजे. रांगा लावून तुमची उत्पादने विकली गेली पाहिजेत. एवढी क्वालिटी आणि एवढा प्रतिसाद, चांगला माल आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे.
बचत गट अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित झालं पाहिजे. प्रशिक्षण हे महिलांच्यादृष्टीने भविष्यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब राहणार आहे. कारण, शेवटी पॅकेजिंग आणि मार्केटिंग याच्यावर भर दिला पाहिजे. मिटकॉन सारख्या संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटाला प्रशिक्षण देण्यात येईल. वर्षभरामध्ये महिला बचत गटांना प्रशिक्षित केलं पाहिजे, अशा पद्धतीचा उपक्रम राबविण्यात येईल. वर्षभरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातला पहिला बचत गटांच्या विक्रीचा मॉल तयार करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री म्हणून नक्की पावले उचलली जातील. असेही डाॕ. सामंत म्हणाले.
गृहराज्य मंत्री कदम म्हणाले, ग्रामविकास खात्याअंतर्गत येत असलेल्या उमेद च्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगळी क्रांती घडवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. उमेद अभियान सुरू झाले तेव्हापासून राज्यातील महिलांची झपाट्याने प्रगती सुरू आहे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच दीपप्रज्ज्वलनही करण्यात आले. प्रस्ताविक प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी केले.