९३ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनातील ‘मराठी नाटकातील स्त्रियांचे स्थान’ हा परिसंवाद सहभागी वक्तयांच्या किस्सेवजा आत्मकथनांमध्ये अक्षरश: वाहून गेला. त्यातल्या त्यात सूत्रसंचालक वि. भा. देशपांडे आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी परिसंवादाचे भरकटलेले तारु मार्गावर ठेवण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला; परंतु अन्य वक्तयांनी तो साफ हाणून पाडला.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनीच काय ती विषयाला धरून मांडणी केली. मराठी रंगभूमीच्या पावणेदोनशे वर्षांच्या इतिहासात स्त्रियांनी रंगभूमीला दिलेल्या योगदानाचा धावता आढावा त्यांनी घेतला. तत्कालीन सामाजिक परिस्थिती, पुरुषी मानसिकता, स्त्रीवरील संसाराच्या जबाबदाऱ्या, नैतिकतेची बंधने असे सगळे अडथळे पार करत स्त्रियांनी आजवर रंगभूमीवर वाटचाल केली आहे. स्त्रीजाणिवांच्या नाटकांची आपल्याकडे मोठी परंपरा असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. नाटककार स्त्रिया कमी दिसत असल्या तरी आता ती परिस्थिती बदलते आहे. इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र, मधुगंधा कुलकर्णी, विभावरी देशपांडे यांच्यासारख्या लेखिका आता सजगतेने नाटके लिहिताहेत. त्याचबरोबर नाटकांतून भूमिका करण्याबरोबरच त्यांचे दिग्दर्शनही करीत आहेत. मात्र, माधुरी पुरंदरे आणि मेघना पेठे या रंगकमीर्ंनी नाटके लिहिली असती तर ती खूपच वेगळी ठरली असती, असे ते म्हणाले.
‘‘मराठी नाटकात स्त्री जाणिवांची नाटके अनेक संवेदनशील पुरुष लेखकांनी लिहिली आहेत. अगदी ‘शारदा’ नाटकापासून ‘चारचौघी’ पर्यंत त्याचा वानवळा देता येईल. स्त्रियांच्या समस्या स्त्रियाच अधिक अधिकारवाणीने मांडू शकत असल्या तरी आता लिंगभेदापलीकडे जाऊन विचार करायची वेळ आली आहे,’’ असे सांगून चंद्रकांत कुलकर्णी पुढे म्हणाले की, नुकत्याच दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने जयवंत दळवी यांनी ‘पुरुष’ नाटकात या अत्याचाराविरोधात वापरलेल्या हत्याराची आठवण पुनश्च सामाजिक उद्रेकाच्या रूपाने प्रत्ययाला येते आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘प्रतिभेला लिंगभावाची कसोटी लावू नये,’ असे सांगत रंगभूमीवरील स्त्रियांच्या स्थानासंदर्भात अधिक सर्वसमावेशी दृष्टिकोन मांडला. नाटकात स्त्रियांना आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, हे मान्य करतानाच राजकारणात मात्र स्त्रियांनी मिळालेल्या संधीचे सोने करत आपले स्थान निर्माण केले, असे अभिमानाने सांगितले. त्याचबरोबर आजच्या पिढीत सखोल अभ्यास, मेहनत घेण्याची वृत्ती, एकाग्रता आणि समर्पण भावाचा अभाव असल्याचे खुलेपणाने मान्य केले. पण तो काळाचा परिणाम आणि रेटा असल्याचे सांगायला त्या विसरल्या नाहीत.
वंदना गुप्ते यांनी परिसंवाद भरकटल्याचे सांगत पुन्हा आपल्या आत्मकथनाचेच आख्यान लावले. स्त्री प्रधान भूमिका करायला मिळाल्यामुळे आपल्या आयुष्याला वेगळे पैलू पडले, हेही त्यांनी मान्य केले.
संपूर्ण स्वतंत्र स्त्रीचा मनमुक्त आविष्कार व्हायला अजून सामाजिक परिस्थिती अनुकूल नसल्याचे स्मिता तळवलकर यांनी सांगितले. फैय्याज आणि आशालता वाबगावकर यांनी कलावंत म्हणून आपल्या घडणीवरच सगळा बोलण्याचा रोख ठेवल्याने त्यांचे रसाळ आत्मकथन आणि नव्या पिढीबद्दलच्या तक्रारी ऐकून श्रोतृवर्ग खूश झाला. नव्या पिढीतील कुणीही स्त्री-रंगकर्मी या परिसंवादात नव्हती. त्यामुळे त्यांचे म्हणणे कळू शकले नाही.
नाटकातील स्त्रियांचे स्थान आत्मकथनांत हरवले!
९३ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनातील ‘मराठी नाटकातील स्त्रियांचे स्थान’ हा परिसंवाद सहभागी वक्तयांच्या किस्सेवजा आत्मकथनांमध्ये अक्षरश: वाहून गेला. त्यातल्या त्यात सूत्रसंचालक वि. भा. देशपांडे आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी परिसंवादाचे भरकटलेले तारु मार्गावर ठेवण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला;
First published on: 23-12-2012 at 02:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women role in drama disapear