महिलांना संघटित व अन्यायाविरोधात आक्रमक होण्याचा सल्ला देतानाच राजकारणात येण्याचे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात केले. येथील सागर पार्क या मैदानावर रविवारी झालेल्या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद लाभला.जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाब देवकर, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, आदिवासी विकास मंत्री बबन पाचपुते, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. उद्याचा समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी महिला शक्तीचे संघटन होणे ही काळाची गरज आहे. महिलांनी आपल्या जाणिवा विस्तारणे आवश्यक आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या व्याज दरात कपात करण्याची मागणी खा. सुळे यांनी केली. महिलांनी राजकारणात यावे व पक्षाला मजबूत करावे. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कुणाल पाटील यांनी केलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या मागणीचे समर्थन सुळे यांनी केले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे आग्रह धरू, असे आश्वासन त्यांनी दिले. मेळाव्यापूर्वी खा. सुळे यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी तसेच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मेळाव्यात पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा जळगावच्या मंगला पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिता पाटील, तसेच जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुका अध्यक्षांना बोलण्याची संधी देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा