महिलांना दर्शनबंदी असल्यावरून गाजत असलेल्या नगर जिल्ह्य़ातील नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदी यंदा प्रथमच एका महिलेची निवड करण्यात आली. अनिता चंद्रहास शेटे यांची एकमताने देवस्थानच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाची पहिली बैठक सोमवारी पार पडली. दरम्यान, शनिदेवाच्या चौथऱ्यावर परंपरेनुसार महिलांना प्रवेशबंदी योग्यच असल्याचे सांगत अनिता शेटे यांनी अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर या परंपरेचे समर्थन केले.
नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने गेल्या बुधवारी श्री शनिशिंगणापूर देवस्थानचे अकरा जणांचे विश्वस्त मंडळ जाहीर केले. त्यात अनिता चंद्रहास शेटे व शालिनी राजू लांडे या दोन महिलांसह देवस्थानचे माजी अध्यक्ष रावसाहेब बानकर, माजी विश्वस्त बापूसाहेब शेटे व नानासाहेब बानकर, योगेश बानकर, डॉ. वैभव शेटे, आदिनाथ शेटे, दीपक दरंदले, प्रा. आप्पासाहेब शेटे व भागवत बानकर यांचा समावेश आहे. नव्या विश्वस्त मंडळाची पहिली बैठक सोमवारी झाली. अगोदरच महिलांना दर्शनबंदी असल्यामुळे विविध संघटनांकडून आणि लोकांकडून आधीच्या विश्वस्त मंडळावर टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एकमताने महिलेची अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला सर्व नवनियुक्त विश्वस्त उपस्थित होते.
शिंगणापूर गावात चोरी होत नाही, त्यामुळे दरवाजा नसलेल्या घरांचे गाव म्हणून ते ओळखले जाते. तसेच देशात प्रसिद्ध असलेल्या शनिदेवाच्या चौथऱ्यावर परंपरेनुसार महिलांना प्रवेशबंदी आहे. या कारणावरून येथे अधूनमधून वादंग होतात. अलीकडेच एका महिलेने चौथऱ्यावर प्रवेश केल्याने वादंग उठले होते. या पार्श्वभूमीवर या पुरातन देवस्थानच्या विश्वस्त मंडळात यंदा प्रथमच महिलांना स्थान देण्यात आल्याने सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा