तालुक्यातील गारगुंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी या वेळी सर्व महिला उमेदवारांना संधी दिल्याने या गावात महिलाराज अवतरले आहे. निवडणूक रिंगणातील साईकृपा ग्रामविकास मंडळाने सर्व महिलांना उमेदवारी देऊन वेगळा आदर्श निर्माण केला. मतदारांनी साईकृपाच्या या निर्णयास साथ देत महिलांच्या हाती ग्रामपंचायतीची सूत्रे दिली. या महिला उमेदवारांनी सातपैकी पाच विरोधी उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त केल्या.
ग्रामपंचायतीतील विविध गैरप्रकारांमुळे गारगुंडी जिल्हा पातळीवर प्रकाशझोतात आले होते. या पार्श्र्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत शिवसेना प्रणीत साईकृपा ग्रामविकास मंडळाने सर्व महिला उमेदवारांना उमेदवारी देऊन गावाला विकासाच्या मार्गावर नेण्याचा निर्धार केला. मतदारांपुढे पॅनेलचा हा अजेंडा नेण्यात आल्यानंतर मतदारांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सातही जागांवर महिला उमेदवारांना मोठय़ा मताधिक्क्य़ाने विजयी केले.
हिराबाई झावरे, हिराबाई वाळुंज, प्रमिला फापाळे, विजया झावरे, अश्विनी फापाळे, जयश्री झावरे, गुलनाझ बालम शेख या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या आहेत. शिवसेना प्रणीत साईकृपा ग्रामविकास मंडळाचे नेतृत्व प्रा. सुनील फापाळे, राहुल झावरे, बाबाजी फापाळे आदींनी केले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला. गावाला विकासाचा मार्गावर नेण्यासाठी महिलांनी परिश्रम घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2015 रोजी प्रकाशित
सर्व जागांवर महिलांनाच विजयश्री
तालुक्यातील गारगुंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी या वेळी सर्व महिला उमेदवारांना संधी दिल्याने या गावात महिलाराज अवतरले आहे.

First published on: 09-08-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women victory on all seats