सोलापूर : भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांना त्यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात अवैध हातभट्टी दारूबंदीसाठी पुन्हा एकदा महिलांनी घेराव घातला. विंचूर गावात हा प्रकार घडला. तेव्हा आमदार देशमुख यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण दक्षिण सोलापूर मतदारसंघात हातभट्टी दारूचे उच्चाटन करण्याची मागणी केली.
आमदार सुभाष देशमुख यांनी मतदारसंघात गावोगावी लोकसंवाद वाढविला आहे. परंतु त्याचवेळी गावातील अवैध हातभट्टी दारूच्या खुलेआम विक्रीच्या प्रश्नावर महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी माळकवठे येथे रस्ते विकास कामाच्या भूमिपूजनासाठी आमदार देशमुख गेले असताना तेथील महिलांनी गावात अवैध हातभट्टी दारूविक्री थांबण्यासाठी तक्रारी करूनही परिणाम होत नसल्यामुळे त्यात लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आशीर्वाद आहे का, असा थेट सवाल करीत त्यांना घेराव घातला होता. त्यावेळी आमदार देशमुख यांनी मंद्रूप पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गावातील हातभट्टी दारूबंदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
अवैध हातभट्टी दारू केवळ एका माळकवठे गावात विकली जात नाही तर जवळपास सर्व गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात राजरोसपणे विकली जाते. यात प्रामुख्याने घरातील पुरुष मंडळी आणि तरुण मुलांना दारूचे व्यसन वाढले असून त्याचा त्रास महिला आणि लहान मुलांना सहन करावा करावा लागत आहे. त्यातूनच विंचूर येथे आमदार सुभाष देशमुख यांना महिलांच्या रोषाला सामोरे लागले. याच विंचूर गावातील महिलांनी अलिकडेच राज्य उत्पादन शुल्क विभागच्या अधीक्षकांची भेट घेऊन गावातील अवैध हातभट्टी विक्री थांबविण्याची मागणी केली होती. परंतु त्याचा लगेगच परिणाम न झाल्यामुळे शेवटी महिलांनी पुन्हा एकवटून आमदार देशमुख यांची वाट रोखून रोष व्यक्त केला.