सांगली : स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरूध्द त्वरित कारवाई करण्याची मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या मागणीचे निवेदन इस्लामपूर पोलीस ठाण्यात देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने म्हणाल्या, स्वातंत्र्यदिन देशभर राष्ट्रीय सण म्हणूनसाजरा करण्यात येतो. याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचा भिडे यांना अधिकारच नाही. स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. अप्रत्यक्ष या स्वातंत्र्यवीरांचा अवमानच आहे. राष्ट्रगीताबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले असून अशा व्यक्तींना देशभक्त म्हणावे, की देशद्रोही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अशा देशद्रोही विचारसरणीच्या व्यक्तीवर त्वरित गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. राज्यात गेल्या दीड वर्षात ६ हजार ८८९ मुली बेपत्ता झाल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था ढासळली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी घेउन तात्काळ राजीनामा द्यावा अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तालुका सरचिटणीस स्वाती कदम, तालुका सदस्या अर्चना पाटील, शितल कदम, वैशाली शिंदे, धनश्री खोत, प्राजक्ता पाटील व महिला उपस्थित होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens nationalists demand action against sambhaji bhide mrj