वध्र्यात वित्त कंपन्यांकडून महिला व्याजासाठी वेठीस, राज्यातील शेकडो कुटुंबांना नव्या ‘सावकारी’चा तडाखा
वित्तपुरवठा करणाऱ्या विविध खासगी कंपन्यांकडून वर्धा जिल्ह्य़ात नवी ‘सावकारी’ सुरू झाली असून बचतगटांना लक्ष्य केल्यामुळे शेकडो कुटुंबांची कर्जामुळे वाताहत होत आहे. सुरुवातीला आमिषे दाखवून येथील महिला बचतगटांना अवाच्या सवा दराने कर्जपुरवठा केला जातो. काही काळानंतर वाढत गेलेले व्याज भरण्यास तगादा लावणाऱ्या कंपन्यांमुळे बेजार झालेल्या महिला व्याज भरण्यासाठी नवे कर्ज काढत आहेत. या कर्जचक्रामुळे वसुलीसाठी आलेल्यांना चुकविण्यासाठी अनेक कुटुंबांत डोंगरावर मुक्काम करणे, गाव सोडणे, देहविक्रय करण्याचे अपप्रकार जागोजागी घडत आहेत. चोऱ्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. राज्यभरातही अनेक ठिकाणी वित्त कंपन्यांच्या कर्जआमिषांना महिला बचतगट बळी पडत असल्याची चर्चा आहे.
वर्धा परिसरातील मांडवा, पुलई, परसोडी, धामणगाव, दहेगाव, बेलगाव, टेंभरी, पाचोड, एकबुर्जी व अनेक छोटय़ा गावांत कर्जाचे चित्र भीषण झाले आहे. अर्थनिरक्षरतेमुळे महिलेच्या नावावर मिळणारा पैसा नवरा दारूत उडवून टाकत आहेत. नंतर वसुलीच्या धमक्या असह्य़ झाल्यावर अनेक कुटुंबांतील पुरुष सासुरवाडीत पळ काढतात. मग कर्जबाजारी महिला निराधार होतात. त्यामुळे काही महिला नाइलाजास्तव देहविक्री करीत असल्याचे मांडव्याचे गावकरी सांगतात. ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या ‘नाम’द्वारे दत्तक घेण्यात आलेल्या आमला गावातील महिलांनी तर आठ-आठ दिवस भीतीपोटी गावडोंगरावर मुक्काम ठोकला. हप्ते चुकविण्यासाठी महिलांनी पोळ्याच्या दिवशीही कामे केली. काही कर्जबाजारी महिला मजुरीही करीत आहेत. पत्नीच्या नावे पैसा उचलणारा पुरुष सालकरी म्हणून एकाच शेतमालकाचा वेठबिगार झाला आहे. ज्या कर्जातून साहित्य घेतले, ते परत व्याजापोटी विकले आहे. आठवडी बाजार ओस पडलेत. महिन्याकाठी एक एजंट गावातून किमान ५ लाख रुपये उचलतो, अशी माहिती गावचे भयावह चित्र पाहून उद्विग्न झालेल्या विशाल वाघ या युवकाने दिली. या अशा सावकारीतून नवनवे गुन्हे जन्मास येत आहेत. यात सरकारी हस्तक्षेप होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
वसुलीचा बागुलबुवा..
गावातील किमान पाच महिलांचे बचतगट तयार करण्यास प्रथम प्रोत्साहित करून त्यांना मासिक अडीच टक्के दराने किमान १० ते पुढे ४० हजार रुपयांचे कर्ज कौटुंबिक उद्योग सुरू करण्यासाठी दिले जाते. वार्षिक ३० टक्के दराने पैसे घेणारी महिला स्वत:च्या व कुटुंबाच्या आवडीनिवडीत तो खर्च करते. या कंपन्या काही गहाणही मागत नाही. पैसा हातोहात संपतो. कर्जाचे हप्ते सुरू होतात. २० हजार रुपयांवर मासिक ५०० रुपये हप्ता देणे प्रत्येकीला शक्य होत नाही, पण वसुली तर होतेच. ती कशी, तर या महिलाच एकमेकींना जामीन असतात. गटातील एक महिलेचा हप्ता चुकल्यास उर्वरित चार महिला तिचा पिच्छा पुरविण्यासाठी घरावर ठिय्या, शिविगाळ करतात. तू पैसे चुकविले तर आम्हाला पैसे मिळणार नाही, असा सूर असतो. त्यामुळे वसुली कशीही होते.
कर्जाचा विळखा
व्याजाचा हप्ता देऊ न शकणारी महिला मग दुसरी कंपनी शोधते. ती कंपनी या महिलेला तत्परतेने कर्ज देते. एका कंपनीचे कर्ज दुसऱ्या कंपनीच्या कर्जातून चुकविण्याचा प्रयत्न होतो. त्यातूनच थकबाकीदार पाच महिलांचा गट पुन्हा दुसऱ्या कंपनीच्या दावणीला बांधला जातो. हे दुष्टचक्र विस्तारतच असते. हप्ते भरू न शकल्यास त्या मग घरातीलच भांडीकुंडी विकतात. ४०० रुपयांची कोंबडी १०० रुपयांत विकली जाते. कंपनीचा एजंट थेट वाटय़ाला जात नाही. महिलांनीच महिलांना भंडावून सोडण्याचा व वसुलीचा हा प्रकार कंपनीला सहज वसुली मिळवून देतो. प्रसंगी एजंट गटप्रमुख महिलांनाही धमकावतो. गुन्हे दाखल होतील, मुलांना शिकता येणार नाही, नोकरी मिळणार नाही, अशी धमकावणी या निरक्षरांना दबावात आणतो.