रमेश पाटील
१५ एकर जमिनीवरील वनराई भुईसपाट; भूमाफियांकडून माती उत्खनन
वाडा तालुक्यातील खुपरी वन कार्यक्षेत्रात मातीचे बेकायदा उत्खनन सुरू असून जाळे येथील १५ एकर जमिनीवरील वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. बेकायदा उत्खनन आणि वृक्षतोडीची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वनविभागाच्या मालकीच्या जमिनीवर भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. येथील टेकडय़ांचे सपाटीकरण करण्यात येत आहे. हजारो ब्रास मातीचे बेकायदा उत्खनन करण्यात येत आहे.
या जागेपासून काही अंतरावर वनपालांचे कार्यालय आहे. मात्र त्यांना या घटनेची माहिती अद्याप लागलेली नाही. जाळे गावाजवळ १५ एकर जागेवरील साग, खैर, इंजाली आणि ऐनाच्या झाडांची कत्तल करण्यात येत आहे.
जव्हार वनविभागाचे उप वनसंरक्षक अमित मिश्रा यांनी दोन वर्षांपासून खासगी क्षेत्रातील मालकी तोडीला पूर्णत: बंदी घातली आहे. मालकी तोडीला परवानगी मिळत नसल्याने वनमाफियांनी मोठय़ा प्रमाणात बेकायदा तोड सुरू केली आहे.
वाडय़ातील बहुतांश जमिनी या वनराईने नटलेल्या आहेत. वनविभागाकडून मध्यंतरी कठोर धोरण न अवलंबल्यामुळे येथील भूमाफियांचे फावले आहे. यात त्यांनी जंगल नष्ट करण्याचा विडाच उचलला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
जाळे गावाजवळील वृक्षतोड आणि खुपरी येथील उत्खननाची वनविभाग, दक्षता पथक आणि महसूल विभागामार्फत करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे तालुका सचिव देवेंद्र भानुशाली यांनी केली आहे.
मातीने भरलेला एक डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-सी. टी. बागकर , वनपाल खुपरी क्षेत्र