अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतक ऱ्यांना आठ दिवसात आर्थिक मदत न मिळाल्यास अधिवेशनात कुठल्याही मंत्र्याला सभागृहात येऊ दिले जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच भाजप सोबत सत्तेत रहायचे की नाही, या बाबत ४ डिसेंबर रोजी पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आपली भूमिका जाहीर करतील असेही शिंदे यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी विरोधी पक्ष नेते शिंदे यांच्यासह रामदास कदम, दिवाकर रायते आदींनी केली. त्यानंतर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात २० हजार एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावे तसेच येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा अधिवेशनात शिवसेनेकडून एकाही मंत्र्याला सभागृहात जाऊ दिले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
ब्रिटीशकालीन आणेवारी पध्दत बंद करत पंचनाम्यांच्या आधारे नुकसान भरपाई देण्याची मागणी शिंदे यांनी केली. जिरायती, बागायती व फळबागांसाठी राज्य सरकारकडून नुकसानीपोटी मिळणारी मदत अतिशय तोकडी आहे. शेतकऱ्यांचा किमान खर्च भरून निघावा या स्वरूपात मदत करण्यात यावी. पीक विमा योजना केवळ फार्स असून या योजनेसाठी शेतक ऱ्यांवर सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेस आघाडीने मोठय़ा प्रमाणात लूट केल्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. यामुळे भाजपने स्वतचे वजन वापरत केंद्रातुन २५ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत आणावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. तसेच पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शेतक ऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यावर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी फडणवीस यांनी केली होती. आता ते मुख्यमंत्री आहेत. शेतक ऱ्यांच्या आत्महत्येबाबत त्यांच्यावर गुन्हा का दाखल करू नये, असा प्रश्नही त्यांनी केला. सत्तेत भाजप सोबत रहायचे की नाही या संदर्भात ४ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील तसेच शनिवारपासुन नांदेड, बीड, मराठवाडा, जळगाव या ठिकाणी ते दौरा करून पाहणी करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबई वगळता राज्यात इतर ठिकाणचा स्थानिक संस्था कर हटविण्याची मागणीही त्यांनी केली.
..तर मंत्र्यांना सभागृहात येऊ देणार नाही
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतक ऱ्यांना आठ दिवसात आर्थिक मदत न मिळाल्यास अधिवेशनात कुठल्याही मंत्र्याला सभागृहात येऊ दिले जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी दिला.
First published on: 22-11-2014 at 04:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wont allow ministers to enter in assembly eknath shinde