राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तर दिलं. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज होणारी औरंगाबाद सभा आणि त्यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यास दिलेला अल्टिमेटम, तसेच भाजपाच्या बूस्टर डोस सभेबाबत देखील त्या बोलल्या आहेत.
राज ठाकरे यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आजच्या औरंगाबादेतील सभेसाठी शुभेच्छा दिल्या. तर, राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्या दिवशी ईद देखील आहे, त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अल्टिमेटम वगैरे शब्द मी ज्या संस्कृतीत लहानाची मोठी झाले त्यात बसत नाही. यशवंतराव चव्हाण यांनी हा शब्दच कधी वापरला नव्हता. त्यामुळे मला फारसा त्या शब्दाचा अर्थ समजत नाही. इंग्रजीत डिक्शनरीत काहीतरी आहे त्याचा अर्थ. पण, मला असं वाटतं की या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचं अतिशय सक्षम असं सरकार आहे, जे चांगलं काम करतय. हे केवळ मीच म्हणत नाही तर केंद्र सरकारची आकडेवारी देखील हेच सांगते आहे. याचबरोबर एक कार्यक्षम असे गृहमंत्री देखील आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवूयात.”
तसेच, “मला असं वाटतं की देशात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर एक खासदार म्हणून त्यामध्ये मी लक्ष घातलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. उत्तर प्रदेश, दिल्लीत काही घटना घडल्या मला खूप वेदना झाल्या. त्यामुळे देशपातळीवर जेव्हा आपण काम करतो. तेव्हा महाराष्ट्रात जे काय घडलं ते वाईटच आहे, पण उत्तर प्रदेशमध्ये आणि दिल्लीत जे घडलं ते खूपच चिंताजनक आहे.”
भाजपाची बुस्टर डोस सभा आज होणार आहे. मुंबईत महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत, या सभेकडे आपण कसं पाहता. कारण, या सभेनंतर हाय व्होल्टेज ड्रामा घडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी, “हाय व्होल्टेज ड्रामा हा माझा शब्दच नव्हता. नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं, ती वास्तविकता थोडीच असते ते नाटक असतं.” असं म्हटलं.