राज्यात राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले असून अनेक आमदार अजित पवारांच्या गटात आहेत. तर, अजित पवारांना कटशाह देण्याकरता शरद पवार पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी दौरे करायला सुरुवात केली आहे. शरद पवारांनी पक्षाची सूत्रे अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंच्या हाती दिल्याने अनेक नाराज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी एक फोटो रिट्वीट केलाय. त्यात त्यांनी त्यांच्या अनुभवाचे बोल अवघ्या एका वाक्यात कथन केले आहे.
शरद पवारांनी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. परंतु, कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी याला कठोर विरोध केला. जनमत लक्षात घेऊन शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यानंतर त्याच महिन्यात पक्षाच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदाची सूत्रे दिली. यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. दरम्यान, अजित पवार लवकरच भाजपात जाणार असल्याच्याही चर्चा होत्या. परंतु, अजित पवारांनी भाजपात न जाता पक्षातच बंडखोरी केली आणि शिवसेनेप्रमाणे काही आमदारांना सोबत घेऊन भाजपासोबत सत्तेत विराजमान झाले.
हेही वाचा >> “…तर एकनाथ शिंदे आमच्याकडे आलेच नसते”, उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावरून सुधीर मुनगंटीवारांचा टोला
अजित पवारांनी सत्ताधारी पक्षासोबत हातमिळवणी केल्याने त्यांना पक्षातील अनेकांनी साथ दिली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांनीही अजित पवारांना पाठिंबा दिला. यामध्येच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाही समावेश आहे. अजित पवारांनी त्यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्ष पदाचीही सूत्रे दिली आहेत. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी आता एक फोटो रिट्वीट केला आहे. यामध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेताना दिसत आहेत. तिथेच सुप्रिया सुळेही उपस्थित असून त्यांचा चेहरा क्रोधपूर्ण दिसत आहे.
हेही वाचा >> राजीनामा मागे घेताना शरद पवारांच्या मागे बसलेल्या सोनिया दुहान कोण? पहाटेच्या शपथविधीच्या वेळी त्यांनी काय केलं होतं?
युवराज या एका ट्विटरच्या वापरकर्त्याने हा फोटो ट्वीट केला असून, “या फोटोत एका नेत्याचा विनम्र भाव दिसतो पण फोटो झुम केल्यास एका नेत्याची प्रचंड असुरक्षितता देखील पाहायला मिळते. नवे नेतृत्व घडले पाहिजे यासाठी आयुष्यभर झगडणारे साहेब कुठे आणि या कुठे”, असे कॅप्शन दिले आहे.
हाच फोटो रुपाली चाकणकर यांनी रिट्वीट केला आहे. त्या म्हणतात की, “काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात. अनुभवाचे बोल.”
रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्वीटनुसार, सुप्रिया सुळे महिला नेतृत्वाला पुढे येण्यास देत नव्हत्या का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. रुपाली चाकणकर यांनाही असाच त्रास सहन करावा लागला का असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.