मुरुड तालुक्यातील २५ हजार लोकवस्तीला पाणीपुरवठा करणाऱ्या विहुर धरणाच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या धरणाचे पाणी ऐन डिसेंबर महिन्यातच वाहून गेले होते. त्यामुळे अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोर जावे लागत होते.
  मुरुड तालुक्यातील माजगाव, नांदगाव, उसरोली आणि विहुर गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहुर धरणाची उभारणी करण्यात आली. भारत निर्माण कार्यक्रमातून झालेल्या या धरणाच्या वॉलचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने धरणाचे पाणी वाहून गेले. पावसाळ्यानंतर केवळ तीन महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरलेले धरण कोरडे झाले होते. त्यामुळे माजगाव, नांदगाव, उसरोली आणि विहुर गावांना ऐन हिवाळ्यातच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. स्थानिक आमदार मीनाक्षी पाटील यांनी धरणाची पाहणी करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. यानंतर जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनीही या धरणाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.
अखेर लोकप्रतिनिधींचा वाढता दबाब लक्षात घेऊन धरणाच्या दुरुस्ती कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. धरणाच्या भिंतीचा मध्यभाग खणण्यात आला असून वॉल लिकेज आणि पाइप लाइन लिकेजचे काम सुरू करण्यात आले आहे. धरणाचे काम सुरू झाल्याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र आता तरी काम चांगल्या दर्जाचे व्हावे अशी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader