निसर्ग चक्रीवादळामुळे बुधवारी मध्यरात्री पासून महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावली परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.
अद्यापपर्यंत वाई शहर व तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत झाला असून, पाचगणी व महाबळेश्वर येथील काम आज दिवसभर सुरूच होते. दरम्यान संततधार सुरु असणाऱ्या पावसामुळे कामात अडचणी येत असल्याने अधिक विलंब होत आहे.मागील ३२ तासांपासून वीज पुरवठा खंडित आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने व खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. शिवाय, अनेक झाडेही पडली असून, फांद्या वीज तारांवर पडल्या आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बुधवारपासून यंत्रणा पावसापाण्यात काम करत आहे.
आज सकाळपासून प्रभारी अधिक्षक अभियंता सुनील माने यांनी कार्यकारी अभियंता सोनवलकर यांचे समवेत वाई, पाचगणी, महाबळेश्वर व जावलीला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ठेकेदार व साहित्य उपलब्ध करण्याची व्यवस्था केली आहे. वाई शहर व तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. तर, पाचगणी व महाबळेश्वर शहरातील वीजपुरवठा आ सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.