हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या ठप्प आहे. त्यामुळे महामार्गाची वडखळ ते इंदापूर या पट्टय़ात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे महामार्गावरील अपघातांचे दृष्टचक्र थांबताना दिसत नाही. रायगड जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत या मार्गावर ४९ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोकणवासीयांचे दुर्दैवाचे दशावतार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले होते. २०२२ हे वर्ष सरायला आले तरी ८४ किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. मूळ ठेकेदाराची हकालपट्टी करूनही कामाला गती मिळू शकलेली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत काम बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना खडतर परिस्थितीला सामोरे जात प्रवास करावा लागत आहे.

महामार्गाची दुरवस्था झालेली असतानाच महामार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या दहा महिन्यांत रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गावरील भागात १४५ अपघात झाले असून, त्यामध्ये ४९ जणांचा मृत्यू तर १६० जण जखमी झाले आहेत, त्यामुळे दुहेरी संकटाला कोकणवासीयांना सामोरे जावे लागत आहे.

मानवी साखळी आंदोलन

मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ ते इंदापूर या अंतरात महामार्गाची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याकडे सरकारचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष याविरोधात रायगड प्रेस क्लबच्या वतीने ९ नोव्हेंबर रोजी कोलाड येथे मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील पत्रकार मोठय़ा संख्येने सहभागी होतील. रायगड प्रेस क्लबच्या कार्यकारिणीची बैठक पोलादपूर येथे संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्ग घडलेले अपघात

(जानेवारी ते सप्टेंबर)

एकूण अपघात – १४५

मृत्यू – ४९

गंभीर जखमी – ११८

किरकोळ जखमी – ४२