धाराशिव : सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले स्वप्न आता प्रत्यक्ष साकार होत आहे. एकूण ८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. धाराशिव ते तुळजापूर या पहिल्या टप्प्यातील ३० किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या कामास शनिवारी प्रारंभ झाला. भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वाहन व यंत्रांचे नारळ फोडून पूजन केले. लवकरच दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला शब्द पाळला आहे. दोन वर्षांच्या आत तुळजाभवानी एक्सप्रेसचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

शनिवारी धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) शिवारात रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर-तुळजापूर-धाराशिव हा रेल्वेमार्ग जाहीर केला होता. या नवीन मार्गाचे काम २०१९ सालीच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तत्कालीन राज्य सरकारने राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के निधी उपलब्ध करून दिला नव्हता. त्यामुळेच अडीच वर्षे हे काम रखडले असल्याचा आरोप भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी ४५२.४६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला आता गती आली आहे. सुरूवातीला पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र आता तीन टप्प्यांत कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम शनिवारी सुरू झाले. उर्वरित दोन टप्प्यांचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार पाटील यांनी दिली. पुढील दोन वर्षांच्या आत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असल्याचे संबंधित अधिकारी आणि काम करणार्‍या कंपनीने जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील १५ गावांमधील ४९४.२६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात बोगद्याच्या कामांना हाती घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – Ajit Pawar on Baramati Elections: “मीही आता ६५ वर्षांचा झालोय”, अजित पवारांचं बारामतीमध्ये सूचक विधान; म्हणाले, “पिकतं तिथे विकत नसतं”!

एकूण अंतर ८४ किलोमीटर; ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण ८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ३२ गावांतील एक हजार ३७५ एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्यात आली आहे. संपादीत जमिनीच्या वाढीव मावेजासाठी दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांची लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

धाराशिव-तुळजापूर ब्रॉडगेजसाठी ५४४ कोटींचा खर्च

पहिल्या टप्प्यातील ३० किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी ५४४ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. जास्तीत जास्त ३० महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वेस्थानक उभारले जाणार आहेत. या रेल्वेमार्गामुळे तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर येणार आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : “कुटुंबातील फूट समाज स्वीकारत नाही, मलाही याचा अनुभव”, अजित पवारांची कबुली!

तीन नवीन रेल्वेस्थानक

धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. धाराशिव ते सांजा या १० किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे. सांजा ते वडगाव या १२ किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरे रेल्वेस्थानक तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंंतरावर तिसरे स्थानक उभारले जाणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण चार स्थानके असणार आहेत. त्यात धाराशिव येथील सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २१ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.