सातारा लोकसभा हा यशवंतराव चव्हाणांचा मतदारसंघ असल्याने त्यांच्या परंपरेला साजेसे काम उदयनराजेंकडून व्हावे, अशी अपेक्षा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केली. सभेपूर्वी महागणपती मंदिरात उदयनराजे यांनी नारळ चढविला आणि पदयात्रेस प्रारंभ केला, त्यांनतर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
येथील साठे मंगल कार्यालयात सातारा लोकसभा मतदार संघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मदन भोसले बोलत होते. या वेळी उदयनराजे भोसले, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील, महिला अध्यक्षा रजनी पाटील, पार्थ पोळके, विकास शिदे आदी या वेळी उपस्थित होते.
उदयनराजे भोसले यांची निवडणूक आहे म्हणून पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे असे सांगून श्री. भोसले म्हणाले काँग्रेसमुक्त भारत ही कल्पनाच कोणी करू शकत नाही. जाणीवपूर्वक देशावर येऊ घातलेले संकट टाळण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडून काही चुका जरूर झाल्या असतील. पण या दहा वर्षांत काँग्रेस सरकारकडून फार मोठा विकास झाल्याचे मान्यच करावे लागेल. राष्ट्रहित म्हणून निवडणुकीच्या कामात सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे आणि उदयनराजे भोसलेंना विजयी करावे, असे अवाहनही त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले.
सातारा जिल्ह्य़ाचं लोकसभेत नेतृत्व करणे ही फार मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. असं सांगून उदयनराजे भोसले म्हणाले, जिल्ह्य़ातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्याचं काम मी करेन. सातारा मतदार संघ हा १५० किलोमीटरचा प्रवास असून त्यात सहा नगरपालिका आणि २ हजार २४२ गावे आहेत. याची जाणीव मला आहे. मात्र तरीही मतदार संघाला साजेसे काम माझ्याकडून नक्की होईल. आघाडी सरकारमुळेच जिल्ह्य़ात विकासाची अनेक कामे झाली आणि एवढा मोठा दुष्काळ आपल्याला जाणवला नाही. देशहितासाठी मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्य़ासाठी मागील तीन वर्षांत मोठा निधी दिला आहे. जे लोक ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेलाही निवडून येत नाहीत अशा उमेदवारांना लोकसभेला उमेदवारी करताना किमान आचारसंहिता असायला हवी. या वेळी पार्थ पोळके, रजनी पाटील, नंदकुमार खामकर, प्रताप देशमुख, अल्पना यादव, दिलीप वाडकर, प्रा. दिलीप जगताप आदींची भाषणे झाली.
चव्हाणांच्या परंपरेला साजेसे काम उदयनराजे यांच्याकडून व्हावे
सातारा लोकसभा हा यशवंतराव चव्हाणांचा मतदारसंघ असल्याने त्यांच्या परंपरेला साजेसे काम उदयनराजेंकडून व्हावे, अशी अपेक्षा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केली.
First published on: 07-04-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work of yashwantrao chavan tradition by udayanraje bhosale