Maharashtra Assembly Winter Session : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर १० दिवसांनी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारचा विस्तार करण्यात आला. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विविध जातीजमातीची समीकरणं साधताना तिन्ही पक्षांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिला. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला असून ३९ जणांपैकी १८ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी (एकनाथ शिंदे व अजित पवार) १० दिवसांपूर्वीच शपथ घेतली होती. असे मिळून फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकूण ४२ मंत्री आहेत. या मंत्र्यांमध्ये विधानभवनातील दालनांचं वाटप करण्याची, बंगल्यांचं वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यापैकी नागपूर विधान भवनातील दालनांचं वाटप पूर्ण झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व मंत्र्यांमध्ये दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांमध्ये दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. नागपूरमधील विधान भवनातील जुनी इमारत, नवी इमारत व विस्तारित इमारतीत मंत्र्यांना दालणं देण्यात आली आहेत. सर्व मंत्री आता आपापल्या दालनात बसून त्यांचं कामकाज पाहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दालन क्रमांक चारमध्ये बसून त्यांचं कामकाज करतील. तर एकनाथ शिंदे यांना दालन क्रमांक नऊ, अजित पवारांना दालन क्रमांक एक देण्यात आलं आहे. तर, जयकुमार रावल, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ यांना अनुक्रमे पाच, दोन, तीन व चार क्रमांकाचं दालन देण्यात आलं आहे. भाजपाचे मंत्री दुसऱ्या इमारतीतून त्यांचं कामकाज पाहतील.

हे ही वाचा >> “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांचं सूचक वक्तव्य; तर्कवितर्कांना उधाण

बंगल्यांचं वाटप कधी होणार?

चंद्रकांत पाटील यांना १०१, पंकजा मुंडे यांना १०२, गिरिश महाजन यांना १०३, चंद्रशेखर बावनकुळे यांना १०४,आशिष शेलार यांना १०६, अशोक उईके यांना १०५ व मंत्री उदय सामंत यांना २०५ क्रमांकाचं दालन देण्यात आलं आहे. नागपूरमध्ये रविवारी सायंकाळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर आता रवी भवनातील बंगले देखील मंत्र्यांसाठी सज्ज झाले आहेत. पुढील एक-दोन दिवसांत मंत्र्यांमध्ये बंगल्यांचं वाटप केलं जाईल. मंत्र्यांच्या बंगल्यांची रंगरंगोटी व डागडुजीचं काम युद्धपातळीवर चालू आहे. आता या बंगल्यांना केवळ मंत्र्यांच्या नावांच्या पाट्यांची प्रतीक्षा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work offices distribution in ministers of devendra fadnavis cabinet nagpur vidhan bhavan asc