राजर्षी शाहू जन्मस्थळाचे काम अद्यापही रखडले असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह समितीचे सदस्य, अधिकारी, ठेकेदार यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दिसून आले. हे काम ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी माने यांनी या वेळी दिली.    
राजर्षी शाहू यांच्या जन्मस्थळाचा विकास करण्याचे काम गेले अनेक वर्षे चर्चेत आहे. शाहूमहाराजांच्या २६ जून रोजी होणाऱ्या जयंतीपूर्वी हे काम पूर्ण होईल, अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. जिल्हाधिकारी माने, समितीचे सदस्य, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. कामाच्या ठेकेदाराने ९० टक्के काम पूर्ण केल्याचा दावा केल्यावर उपस्थित चकित झाले. समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यावर त्यांनी ती मान्य केली.    
घटनास्थळी एकूण कामाचा आढावा घेण्यात आला. तेव्हा मंजूर रकमेच्या ७० टक्के व एकूण कामाच्या ५५ टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसून आले. या कामाच्या बाबतीत मक्तेदारांकडून दिरंगाई होत असल्याचेही दिसून आले. त्याविषयी तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर ३१ ऑक्टोबरपूर्वी काम पूर्ण येईल, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या वेळी कामाच्या दर्जावरून समितीच्या सदस्यांनी साशंकता व्यक्त केली. दर्जाहीन कामाबाबत सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. त्यांना प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी बोलविले जाणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.    
दरम्यान, शाहू जयंतीनिमित्त करवीरनगरीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा चौकातील शाहूमहाराजांच्या पुतळय़ाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. आकर्षक विद्युतरोषणाई केली आहे. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांना शाहू पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. टोलविरोधी आंदोलनाचे दर्शन हे या मिरवणुकीचे वैशिष्टय़ असणार आहे. तसेच उद्यापासून दोन दिवस कोल्हापुरात पहिले भटके विमुक्त साहित्य संस्कृती संमेलन होत आहे. सकाळी ९ वाजता ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दादासाहेब मोरे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत, तर स्वागताध्यक्ष दलित मत्र व्यंकाप्पा भोसले आहेत.

Story img Loader