इन्सुली सूत गिरणी कामगारांना थकीत देय रक्कम मिळवून देण्यासाठी गिरणी कामगारांना संघटनांनी वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे. या कामगारांना घरे मिळवून देण्याचे आश्वासनही हवेतच विरले असल्याचे बोलले जात आहे. गिरणी कामगार संघटना गप्प कशासाठी राहिली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
इन्सुली स्पिनिंग मिल रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एकमेव अशी होती. तत्कालीन मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या पुढाकाराने ही स्पिनिंग मिल सुरू झाली. त्या वेळी लोकांनी रोजगार निर्माण होत असल्याने कवडीमोल भावाने जमिनी दिल्या.
या मिलला पायाभूत सुविधांचा अभाव व कच्च्या मालाचा तुटवडा भासत होता. शेवटच्या टप्प्यात ही मिल इचलकरंजीच्या माजी खासदार कलुपा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांची सहकारी संस्था चालवत होती.
या गिरणीच्या कामगारांचा प्रश्न राजकारणासाठी उपयोग करून घेण्यात आला, पण प्रत्यक्षात गिरणी कामगारांच्या हाती काहीच लागले नाही. कामगारांना घरे व थकीत देय रकमा मिळवून देण्याचे आश्वासन गिरणी कामगार संघटनांनी दिले, पण त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना कामगारांत आहे.
राज्य सहकारी बँकेने या गिरणीसाठी कर्ज दिले होते. त्या थकीत कर्जाच्या रकमेपोटी सुमारे १०३ एकर जमिनीचा लिलाव घातला. ही जमीन बिल्डर्सने घेतली आहे. मात्र सरकारने किंवा बँकेने गिरणी कामगारांच्या थकीत देय रकमेचा विचार केला नाही, असे बोलले जात आहे.
राष्ट्रीय मिल संघाचे अध्यक्ष, राज्यमंत्री सचिन अहिर कामगारांना न्याय मिळवून देतील, असे आश्वासन देण्यात आले, पण त्याची कोणीही दखल घेतली नाही. या गिरणीचा आयकरही कोटय़वधीच्या घरात गेला आहे, असे समजते.