करमाळा तालुक्यातील रामवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात वाळूचा बेकायदेशीर व बेसुमार उपसा करणाऱ्या एका टोळीला कुर्डूवाडीच्या प्रांत मनीषा कुंभार यांनी स्वत: धाव घेऊन केलेल्या कारवाईत जेरबंद केले. या वेळी ५७ वाहनांसह ९४ ब्रास वाळू हस्तगत करताना झारखंड येथील ५० कामगारांना ताब्यात घेण्यात आले. करमाळा तालुक्यातील वाळू तस्करीच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
या कारवाईत वाळूने भरलेल्या २४ मालमोटारी व १६ रिकाम्या मालमोटारी तसेच वाळू उपसा करण्यासाठी लागणारे १५ पोकलेन व दोन जेसीबी अशी वाहने जप्त करण्यात आली. ही वाळू तस्करी पुणे जिल्ह्य़ासाठी केली जात असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले. करमाळ्याजवळ रामवाडी येथे भीमानदीच्या पात्रातील दोन ठिकाणच्या वाळू उपसा करण्याचा ठेका दत्तात्रेय महाळू गायकवाड (रा.जिंती, ता. करमाळा) यांना मिळाला होता. नियमानुसार या दोन्ही ठिकाणांच्या वाळू उपसा करण्याचा ठेक्याचा कब्जा ठेकेदाराला काही तांत्रिक कारणामुळे तहसीलदारांनी दिला नव्हता. परंतु तरी देखील राजकीय वरदहस्तामुळे या भागातून बेकायदेशीर बेसुमार वाळूची तस्करी होत असल्याच्या तक्रारी होत्या. अखेर कुर्डूवाडीच्या प्रांत मनीषा कुंभार व त्यांच्या पथकाने करमाळ्यात अचानक भेट देऊन नदीपात्रातून होणारी वाळू तस्करी रोखली. या कारवाईत मोठय़ा प्रमाणात वाहने व झारखंड येथील ५० कामगारांना पकडण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात राजरोसपणे ही वाळू तस्करी करणाऱ्या संबंधित मंडळींना अद्यापि हात लावण्यात आला नाही. करमाळा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा