डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे तीव्र पडसाद रायगडात उमटले आहेत. या हत्येच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागील कटात सहभागी असणाऱ्या मारेकरी आणि सूत्रधारांना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. शासनाच्या अकार्यक्षमतेचा निषेधही करण्यात आला.  
 अंधश्रद्धेच्या विरोधात जवळपास दोन तप लढा देणाऱ्या तसेच पुरोगामी विचारांनी महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ठिकाण पोलीस स्टेशनपासून केवळ १०० मीटर अंतरावर होते. हे राज्यसरकारच्या अकार्यक्षमतेचे द्योतक असल्याचा आरोप शेकापने केला आहे. दाभोलकर यांच्या हत्येमुळे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला मान शरमेने खाली घालावी लागली असल्याचेही शेकापने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राज्यात सामान्य माणसाचे जीवन आता सुरक्षित राहिले नसल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे पक्षप्रतोद सुभाष पाटील यांनी म्हटले आहे. या हत्येनंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री यांनी दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजेही राज्यसरकारची अकार्यक्षमतेची कबुली असल्याचे शेकापने म्हटले आहे. दाभोलकरांच्या हत्येमागील कटाचे सूत्रधार आणि त्यांचे मारेकरी यांचा तातडीने शोध घेऊन, त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी पक्षाने केली आहे.
अलिबाग येथील शेतकरी भवन ते रायगड जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आ. मीनाक्षी पाटील, शेकापचे जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद सुभाष पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी पंचायत समिती सभापती आस्वाद पाटील, नगराध्यक्षा नमिता नाईक, पुरोगामी युवक संघटनेचे गौतम पाटील अंधश्रद्धा निर्मूलन समितीते राज्य चिटणिस नितीन राऊत यांच्यासह मोठय़ा संख्येन कार्यकर्ते तसेच स्थानिक सहभागी झाले होते.