सांगली : पंढरीची आषाढी वारी झाल्यानंतर चंद्रभागा तीर स्वच्छ करण्यासाठी सांगलीतील निर्धार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सुट्टीचा दिवस गाठून पंढरीची स्वच्छता वारी केली. श्रमदानातून पंढरपुरातील चंद्रभागा तीरावर साचलेला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य एकत्र करून पायर्यावरील मातीही काढण्यात आली. तसेच कठड्यांच्या भिंतींनाही रंगरंगोटी करून उजाळा देण्यात आला.
पंढरीची वारी झाल्यावर तेथील नागरिकांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्वच्छतेचा. लाखो वारकरी बांधव वारी काळात पंढरपूरला भेट देत असल्याने वारी नंतर स्वच्छतेचे कामही तितक्याच युद्धपातळीवर होणे गरजेचे असते. गेली काही वर्षे सांगलीत स्वच्छतेचा ध्यास घेऊन समाजहिताचे काम करत असणार्या निर्धार फाउंशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व त्यांच्या पथकातील तरुणांनी पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तिरी स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता वारीला सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शुभेच्छा दिल्या. या स्वच्छता दूतांना पंढरपूरला येण्याजाण्यासाठी कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक दानशुरांनी बसची व्यवस्था केली.
हेही वाचा – राज्य नगरपालिका शिक्षक संघ भाजप प्रणित म्हणून काम करणार, आमदार जयकुमार गोरेंची माहिती
स्वच्छता अभियानाचे प्रमुख दड्डणावर यांनी सांगितले, गतवर्षीच्या तुलनेत यावेळी कचर्याचे प्रमाण ५० टक्के कमी असल्याचे दिसून आले असून, ही जनजागृती आश्वासक आहे. या स्वच्छता अभियानामध्ये भारत जाधव, मारुती देवकर, भरतकुमार पाटील, सतिश कट्टीमणी, मनोज नाटेकर, गणेश चलवादे, संदेश खोत, कृष्णा मडिवाळ, वसंत भोसले, रफिक मोमीन आदींसह मोठ्या संख्येने स्वच्छतादूत उपस्थित होते.