सांगली : सांगली-कोल्हापूर पूरनियंत्रणासाठी जागतिक बॅंकेने चार हजार कोटीची मदत देऊ केली आहे. या निधीतून पूरधोका टाळण्यासाठीच्या उपायावर मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
खासदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बॅंकेने या प्रकल्पाकरीता सुमारे ४००० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केलेले आहे. या निधीच्या योग्य विनियोगाच्या अनुषंगाने बैठकीमध्ये मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी पुरनियंत्रण प्रकल्पाअंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांचे सविस्तर सादरीकरण केले. या बैठकीत जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव दिपक कपूर यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीचा आढावा, तसेच महापुराचे वापराविना वाहून जाणाऱ्या पाण्याचा अहवाल, कृष्णा-भिमा स्थिरिकरण या विषयांवर सखोल चर्चा केली.
तसेच जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींची ३ पथके महापूर बाधित क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पूर नियंत्रण कामे, भुस्खलन उपाययोजना, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसास्थळे संरक्षित करणे, पुराची पूर्वकल्पना देणे आपत्ती व्यवस्थापन करीता लागणारी सामुग्री व उपकरणे खरेदी करणे आदी कामे केली जाणार आहेत, असे खासदार पाटील यांनी सांगितले. यावेळी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते.