जग प्रचंड वेगाने बदलत असून या बदलत्या जगात समरसून जाण्याची क्षमता राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत आहे असे प्रतिपादन या विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ पत्रकार व कवी उत्तम कांबळे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी कुलगुरू डॉ. मोरे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संशोधन डॉ. राजेंद्र पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. भीमराव उल्मेक, कुलसचिव सुनील वानखेडे, निमंत्रक पोपट कर्डिले, डॉ. राजीव नाईक, विद्यार्थी कल्याण अधिकारी, शरद पाटील, डॉ. राजेंद्र वाघ, विद्यार्थी परिषद सभापती टेकाळे, निमंत्रक अभय गायकवाड उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे देशातले सर्वोत्तम विद्यापीठ असून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार येथे संशोधन होते. या विद्यापीठाने आतापर्यंत २११ हून अधिक पिकांचे वाण विकसित केले असून एक हजारहून अधिक पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत.
ज्येष्ठ पत्रकार कांबळे म्हणाले, कृषी शिक्षणात मिळालेला प्रवेश ही एक सुवर्ण संधी आहे. या संधीचे सोने करा. शेतकरी समजून घ्या. त्यासाठी पहिले महात्मा जोतीराव फुलेंच्या शेतकऱ्यांवरील कादंबऱ्या वाचा. फुले वाचल्याशिवाय शेतकरी कळणार नाही. पदवी, पदव्युत्तर शिक्षण हे आयुष्यातील शेवटचे शिक्षण नसून शिक्षणाच्या चौकटीबाहेर जावून शेतकऱ्यांशी व समाजासी संवाद साधा. विद्यार्थ्यांनी जीवनाचे ध्येय स्पष्ट ठेवा. ध्येय स्पष्ट असेल तर मनुष्य यशस्वी होतो.
कांबळे म्हणाले, या धावत्या जगात मनुष्य आणि वस्तुंची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत ज्या माणसांचे मातीशी घटृ नाते आहे तोच माणूस या स्पर्धेत यश प्राप्त करतो. तुमचे आयुष्य तुम्हाला घडवायचे आहे, स्पर्धेशिवाय आयुष्य घडत नाही. जगण्याला कारण असेल तर, जगणे सुंदर बनते. आयुष्यात विद्यार्थ्यांनी शिक्षणाने आपली ओळख मिळवावी. यावेळी त्यांनी बुध्द, आंबेडकर, फुले, मीराबाई, सॉक्रेटीस, न्यूटन आणि गुरूनानक यांच्या आयुष्यातील दिशादर्शक घटना सांगून विद्यार्थ्यांचे ध्येय स्पष्ट ठेवण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. उल्मेक यांनी करून दिली. यावेळी कृषीगंध या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. पदव्युत्तर महाविद्यालयाचा सन २०१३-१४ साठी सवरेत्कृष्ट विद्यार्थी म्हणून भगवान वालझडे यांना तर पीएचडीचा सवरेत्कृष्ट विद्यार्थी म्हणून प्रमोद मगर यांना मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन टेकाळे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा केळकर आणि उल्हास राक्षे यांनी केले. आभार अमित िशदे यांनी मानले.
जागतिक बदलात कृषी विद्यापीठाची भूमिका महत्वाची – कुलगुरू डॉ. मोरे
जग प्रचंड वेगाने बदलत असून या बदलत्या जगात समरसून जाण्याची क्षमता राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत आहे.
First published on: 19-04-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World change agriculture college