पिण्याच्या पाण्याच्या फेकून दिलेल्या बाटल्यांमध्ये पुनर्वापर होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांना उपयोगात आणून उभ्या केलेल्या भिंतींची कुटी, छोटेखानी घराचे एक प्रारूप येथील दोन मैत्रिणी एकत्र येत उभे केले आहे. औरंगाबाद येथील कल्याणी भारंबे आणि नमिता कपाळे यांनी उभे केलेले हे प्रारूप दौलताबाद रोडवरील शरणापूर फाट्यावर उद्याच्या (५जून) जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाहण्यासाठी खुले होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराच्या इतस्तः पडलेल्या १६ हजार पाण्याच्या  बाटल्या आणि पुनर्वापर होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकचे संकलन करून ४ हजार चौरस फुट जागेत ३४ बाय ११, ११ बाय १५, २० बाय २०, २२ बाय २२ आकारात घरासारखी व गोलाकार कुटी उभारण्यात आलेली आहे. यातील बांधकामामध्ये विटांचा वापर पूर्णपणे टाळलेला आहे. माती-शेणाच्या थापणीत प्लास्टिक बाटल्यांमध्ये पूर्ण ठासून पुनर्वापरात येऊ न शकणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या हवाबंद पद्धतीने भरण्यात आलेल्या आहेत. अशा बाटल्यांची प्रत्येक घरांसाठी ९ इंच रूंदीच्या भिंती उभारलेल्या आहेत.

औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयातून फाईनआर्टची पदवी संपादन केलेल्या कल्याणी आणि नमिता या मैत्रीणींनी सांगितले की, या पर्यावरणपूरक घरांची संकल्पना करोनातील टाळेबंदीच्या काळात सूचली. त्याविषयी अधिक माहिती घेतली असता गुवाहाटीमध्ये शालेय मुलांकडून फेकून दिलेल्या प्लास्टिकला वापरात आणणारे प्रकल्प राबवले जात असल्याचे आम्ही पाहिले. त्याचा अभ्यास केला. प्रकल्प साकारण्यासाठीचे अंदाजपत्रक काढले. ३ ते ४ लाख रूपये त्यासाठी खर्च आला. या प्रकल्पाला वावर असे नाव दिले. आम्ही दोघीही सर्वसामान्य घरातील आहोत. 

भूकंप प्रवण भागासाठी उपयोग –

 “भूकंप प्रवण अथवा भूगर्भातून आवाज येणाऱ्या भागामध्ये घरे पडण्याची नाहक भीती मनामध्ये घर करून असते. अशा भागात पर्यावरणपूरक घरे बांधता येऊ शकतात. यातून कचरा म्हणून फेकून दिलेले प्लास्टिक उपयोगात येते. केवळ पूर्वीच्या काळातील घरे सारवण्यासारख्या कामाच्या स्वरूपात काळजी घ्यावी लागते. फार्म हाऊस, हॉटेल, ढाब्यांवर अशा पर्यावरणपूरक भिंतींचे बांधकाम करता येऊ शकते. याच पद्धतीने स्वच्छतागृहांची उभारणीचे प्रारूप उभे करण्याचा मानस आहे.” असे कल्याणी आणि नमिता यांनी सांगितले आहे.