येत्या २१ डिसेंबरला जगबुडी होणार, सगळी पृथ्वी नष्ट होणार, सात अब्ज संख्येचा मानववंश जीवसृष्टीसह नष्ट होणार, अशा वावडय़ा गेले वर्षभर उठत असताना आता प्रत्यक्षात खरंच तसं काही होणार नाही ना ,या शंकेने भयव्याकूळ झालेल्या लोकांना दिलासा देणारी व असे काहीच घडणार नसल्याचे स्पष्टीकरण देणारी नासाची व्हीडिओ चित्रफीत यू टय़ूबवर आधीच प्रसारित झाला आहे. नासाला जग नष्ट होणार नाही या प्रतिदाव्याबाबत खात्री असतानाही त्यांनी ही चित्रफीत अगोदरच प्रसारित करण्याच्या उद्देशाने का तयार केली नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही चित्रफीत २२ डिसेंबरला प्रसारित केली जाणार होती, पण ती आधीच प्रसारित झाली हे उलट चांगलेच झाले. विशेषत: चीन व इतर काही देशात जगबुडी होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून काही जणांना त्यामुळे अटकही झाली आहे.
माया संस्कृतीच्या दिनदर्शिकेतील भाकितानुसार यंदा ख्रिसमस होणार नाही, त्या आधीच पृथ्वी नष्ट होईल असे बरेच काहीसे सांगितले गेले आहे.त्या बाबत नासाच्या ध्वनिचित्रफितीत म्हटले आहे की, जर तुम्ही ही चित्रफीत बघत आहात याचा अर्थ जग काल नष्ट झालेले नाही. (अर्थात येथे २२ डिसेंबरला ती दाखवली जाते आहे हे गृहीत धरले आहे).
ख्रिसमसच्या अगोदर चार दिवस जग नष्ट होणार असल्याच्या भाकिताने जगभरात खळबळ उडवून दिली होती. काहींनी तर सुरक्षित ठिकाणे शोधून तिथे जाण्याच्या योजनाही आखल्या होत्या. पण जग नष्ट होणार हे भाकीत चुकीचे असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे. नासाच्या संकेतस्थळावर ‘बियाँड २०१२- व्हाय द वर्ल्ड वोन्ट एन्ड’ नावाने ही ध्वनिचित्रफीत टाकण्यात आली आहे.
माया संस्कृतीची दिनदर्शिकाही याच दिवशी संपते आहे असे सांगितले जाते. त्यावर नासाने म्हटले आहे की, आपल्या स्वयंपाकघरातील दिनदर्शिका ३१ डिसेंबरला संपते तेव्हा जगबुडी होत नाही. त्यामुळे माया संस्कृतीची दिनदर्शिका २१ डिसेंबरला संपते असे गृहीत धरले तरी जगबुडी होणार नाही.
निबिरू नावाचा कथित ग्रह पृथ्वीवर आदळणार आहे असे एक कारण सांगितले जाते. त्यावर असे सांगण्यात आले की, हा ग्रह मे २००३ मध्ये पृथ्वीवर आदळणार असे भाकीतही करण्यात आले होते. ते चुकीचे ठरले, त्यामुळे आता तो डिसेंबर २०१२ मध्ये पृथ्वीवर आदळणार असल्याचे सांगण्यात आले त्यात काही तथ्य नाही. खगोलजीवशास्त्रज्ञ डेव्हीड मॉरिसन नासाच्या या व्हिडिओत सांगतात की, जर असा काही ग्रह पृथ्वीवर आदळणार असता तर तो एक चमकदार व प्रकाशमान पदार्थ असता व तो पृथ्वीवरील सर्वानाच दिसला असता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा