पहिलाच आंतरराष्ट्रीय योगदिन नगरमध्ये आज, रविवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विविध संस्था, संघटनांनी योग शिबिर, व्याख्याने परिसंवादाचे आयोजन केले होते. पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील रेसिडेन्सिअल विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी योगसाधनेचा सराव केला. योगामुळे जीवन आनंदी, उत्साही व आरोग्यमय राहण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी या वेळी केले.
योग ही साधना असली तरी आजच्या दिवशी त्याला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. योगदिन साजरा करण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवरही गेल्या आठवडय़ापासून पूर्वतयारी सुरू होती. शाळांची मैदाने, उद्याने, जॉगिंग पार्क योगासनांनी फुलून गेली होती. योगासनांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्थांचे कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले होते.
रेसिडेन्सिअल विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात खा. दिलीप गांधी, महापौर अभिषेक कळमकर, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर व प्रा. भानुदास बेरड, प्रांताधिकारी वामन कदम, मनपाचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी अशोक कडुस व सुनंदा ठुबे, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले आदी सहभागी झाले होते.
उपस्थितांनी सुरुवातीला मानेचे, खांद्याचे, हाताचे, कमरेचे, गुडघ्याचे व्यायाम केले. नंतर बैठय़ा स्थितीतील ४, उभ्या स्थितीतील ५, पोटावर झोपून ३, पाठीवर झोपून ३ अशी एकूण १५ आसने केली. मंचावर योग संघटनेचे राष्ट्रीय खेळाडू गार्गी मोहळे, राज्य खेळाडू साजरी परदेशी, ज्ञानदा सुसरे, मुग्धा कुलकर्णी, निशा सोनार, पायल पाथरकर आदींनी प्रशिक्षक उमेश झोटिंग, जयश्री कोल्हे, डॉ. बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके करून दाखवली. विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते
२ हजार साधकांचा सहभाग
योग विद्याधामच्या नगर शाखेने गुलमोहोर रस्त्यावरील आनंद विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या सामूहिक प्रात्यक्षिकांमध्ये सुमारे २ हजार साधकांनी सहभाग घेतला. या वेळी गेली ३० वर्षांहून अधिक काळ योग प्रचार व प्रसाराची सेवा करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सदस्य कुसुमताई शिवलकर यांचा नगर अर्बन बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष खा. दिलीप गांधी यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे श्याम शर्मा, दत्ता दिकोंडा, वैशाली एकबोटे यांचाही गौरव करण्यात आला. मराठा चेंबर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, नगरसेवक, बँकेचे संचालक, संस्थेचे सदस्य आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा