वरळीतील बीएमडब्ल्यू अपघातप्रकरणातील आरोपी मिहीर शाहला मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी विरार येथील एका रिसॉर्टमधून अटक केली. तो तीन दिवस पोलिसांपासून लपण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, त्याच्या मित्राने त्याचा फोन सुरू केला आणि मिहीरसह त्याचे मित्र आणि कुटुंबीय पोलिसांच्या जाळ्यात सापडले. दरम्यान, पोलिसांपासून लपण्याकरता त्याने आपली ओळख लपवण्याचाही प्रयत्न केल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघातानंतर मिहीर खूप घाबरला होता. तसंच, वडिलांच्या भीतीने ते वांद्र्याला पोहोचण्याआधीच त्याने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे घरी जाण्याऐवजी तो गोरेगाव येथील मैत्रिणीच्या घरी गेला, असा दावा त्याने पोलिसांसमोर केल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

पोलिसांनी अटक केल्यानंतर तो क्लिन शेव्ह लूकमध्ये दिसत होता. त्याने स्वतःची ओळख लपवण्याकरता त्याने दाढी केली असावी, असा दावाही तपासकर्त्यांनी केल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी मिहीरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हिट-अँड-रन दरम्यान पॅसेंजर सीटवर बसलेल्या त्याच्या ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली आहे, तर त्याची आई मीना, बहिणी पूजा आणि किंजल आणि मित्र अवदीप यांची पोलीस चौकशी करत आहेत. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार असून, पोलीस पुढील तपासासाठी त्याची कोठडी मागणार आहेत.

मिहीर शाहला पोलिसांनी कसं पकडलं?

मिहिरने त्याचा आणि त्याच्या मित्रांचा मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे पोलिसांना त्यांचं लोकेशन ट्रॅक करणं अवघड गेलं. मिहिर शाह त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत शहापूरमधील एका रिसॉर्टमध्ये थांबले होता. परंतु, थोड्या वेळाने मिहीर त्याच्या मित्रांबरोबर घरच्यांना न सांगताच विरारला पळाला. दरम्यान, मिहीरच्या मित्राने त्याचा मोबाईल मंगळवारी सकाळी १५ मिनिटांसाठी सुरू केला अन् पोलिसांनी तत्काळ त्यांचं लोकेशन ट्रॅक केलं. यामुळे पोलिसांनी तत्काळ वेगाने त्यांची सुत्रे हलवली आणि मिहीरला विरार येथून अटक केली.

हेही वाचा >> Worli Hit And Run Case : मिहीर शाहच्या मित्राची ‘ती’ एक चूक अन् पोलिसांनी आवळल्या साऱ्यांच्याच मुसक्या! अटकेचा घटनाक्रम वाचा

नेमका अपघात कसा घडला?

मिहीरने वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या कावेरी नाखवा या महिलेला रविवारी सकाळी ५.२५ वाजता धडक दिली. त्यानंतर सुमारे दोन किलोमीटर दूर त्यांना फरफटत नेले. अपघातापूर्वी आरोपीने मद्यप्राशान केल्याचा संशय आहे. दरम्यान, याप्रकरणी यापूर्वी मिहीरचे वडील राजेश शाह आणि चालक राजऋषी बिडावत यांना अटक केली होती. राजेश शाह यांना जामीन मिळाला असून बिडावतला मंगळवारी न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बिडावत याचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्रलंबित असून त्याला आरोपी मिहीरसमोर बसवून चौकशी करायची असल्याची मागणी सरकारी वकील भारती भोसले आणि रवींद्र पाटील यांनी न्यायालयापुढे केली. त्यानुसार, न्यायालयाने आरोपीला ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिहीरच्या रक्तात अल्कोहोल

मिहीरला अटक केल्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. अपघातापूर्वी त्याने मद्यप्राशन केल्याचे ठोस पुरावे पोलिसांकडे असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worli hit and run case mihir shah did clean shave after accident to hide his identity sgk