Worli Hit and Run Case Update : वरळीतील हिट अँन्ड रन प्रकरणात मिहीर शाहाला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी त्याला विरार येथून अटक करण्यात आली. आज शिवडी कोर्टात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

७ जुलै रोजी वरळीच्या कोळीवाड्यात बीएमडब्ल्यू या अलिशान गाडीने दुचाकीवर असलेल्या एका जोडप्याला उडवलं. या अपघातात दुचाकीवरील पुरुष एका बाजूला जाऊन पडला. तर महिला गाडीच्या बोनेटवर अडकली. बोनेटवर अडकलेल्या महिलेला कारचालकाने जवळपास एक ते दीड किमी फरफटत नेलं. तसंच, तिच्या अंगावरून गाडी नेली. या क्रूर प्रकारानंतर या गाडीचा चालक आणि मालक घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी तत्काळ तपासकार्य सुरू केलं. शिंदे गटाती पालघर जिल्ह्याचे प्रमुख राजेश शाह यांचा हा मुलगा मिहीर शाह या प्रकरणात दोषी आढळला. परंतु, घटनेनंतर तो फरार होता. अपघात झाल्यानंतर तो आधी प्रेयसीकडे, मग तिथून बोरीवलीला त्याच्या राहत्या घरी, तिथून ठाणे-शहापूर येथील रिसॉर्टवर कुटुंबीयांबरोबर लपला. त्यानंतर कुटुंबीयांनाही फसवून तो मित्रांबरोबर विरारच्या एका रिसॉर्टवर गेला.

हेही वाचा >> वरळी हिट अँन्ड रन प्रकरण : पीडित कुटंबाला १० लाख रुपयांची अर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; म्हणाले…

दरम्यान, या काळात सर्वांचे फोन बंद होते. त्यामुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. परंतु, त्याच्या मित्राने पंधरा मिनिटाकरता मिहीरचा फोन सुरू केला आणि पोलिसांनी त्यांचा माग काढत त्यांना तत्काळ अटक केली. त्याची आई, दोन बहिणीला ताब्यात घेण्यात आलं असून मित्र आणि त्याला अटक करण्यात आली आहे.

आज त्याला शिवडी न्यायालयात हजर करण्यात आलं. आजच्या सुनावणीत सरकारी वकील आणि मिहीरच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. मिहीरला पोलीस कोठडी मिळावी म्हणून सरकारी वकिलांनी विनंती केली होती. परंतु, मिहीरची सर्व चौकशी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे त्याला आता कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद मिहीरच्या वकिलांनी केला.

युक्तीवादात पोलीस काय म्हणाले?

मिहीरला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. या प्रकरणात मिहीरला मदत केलेल्या सर्वांची चौकशी करायची आहे. आरोपीकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे का? याचा तपास करायचा आहे, असंही पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.

आरोपीचे वकील काय म्हणाले?

त्यावर मिहीरचे वकील म्हणाले, गाडीचा चालक आणि मिहीर यांची समोरसमोर चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याचा फोनही जप्त केला आहे. त्यामुळे त्यांना आता मिहीरची कोठडी का हवी आहे? आरोपीला घटनास्थळीही नेलं होतं. त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. चालक आणि मिहीरचा जबाब जुळला आहे. त्यामुळे मिहीरला कोठडीत टाकण्यासाठी पोलिसांकडे सबळ कारण नाही.

दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी मिहीरला सात दिवसांची कोठडी म्हणजेच १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पीडित कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे जाहीर केलं.

Story img Loader