स्थायी समितीच्या सभेत जमेच्या बाजूवरच महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाची चर्चा लांबली आहे. संकलित कराबरोबर घेण्यात येणाऱ्या वृक्ष व तत्सम करांबाबत समितीच्या बुधवारी प्रशासनाला धारेवर धरले. त्यातील अपुऱ्या माहितीमुळे आता उद्या (गुरूवार) त्यावर चर्चा होणार आहे. दरम्यान रूग्णालयांच्या बांधकाम परवान्यांबाबतची तपशीलवार माहिती समितीच्या पुढच्या सभेत सादर करण्याचे आदेश सभापती किशोर डागवाले यांनी या सभेत दिले.  
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेले मनपाचे अंदाजपत्रक गेल्या दि. १५ ला प्रशासनाने स्थायी समितीला सादर केले. त्यावर मंगळवारपासून समितीत चर्चा सुरू झाली असून डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा सुरू आहे. बुधवारी या सभेचे दुसरे सत्र होते. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यासह अन्य संबंधीत अधिकारी यावेळी उपस्थित होते. गेले दोन दिवस झाले अंदाजपत्रकातील जमेच्या बाजूवरच चर्चा सुरू आहे.
अंदाजपत्रकातील जमा बाजूवर चर्चा करताना आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभाग, एलबीटी आदी बाबींवरही बुधवारी तपशीलवार चर्चा झाली. या चर्चेसाठी संबंधित विभागाच्या प्रमुखांनी सर्व माहिती तयार ठेवण्याचे आदेश सभापती डागवाले यांनी मंगळवारी पहिल्या सत्रातच दिले होते, मात्र आजही अनेक प्रमुखांकडे आवश्यक माहिती उलब्ध नसल्याचेच स्पष्ट झाले. त्यावर सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. संकलीत करासोबत अर्धा टक्का वृक्षकर घेतला जातो, याबाबतचा तपशील सुरूवातीलाच दीप चव्हाण यांनी विचारला. मात्र कोणत्या निकषानुसार हा कर आकारला जातो, याबद्दल प्रशासन निरूत्तर झाले. मागच्या पानावरून पुढे सुरू या पध्दतीने गल्या काही वर्षांच्या अंदाजपत्रकात ही तरतूद करून हा कर गोळा जात असल्याचेच या सभेत स्पष्ट झाले, ते अधिकाऱ्यांनीही मान्य केले. याविषयीचीच माहिती वेळेत उपलब्ध न झाल्याने सभेचे आजचे सत्र तहकूब करण्यात आले.
तत्पूर्वी सभापती डागवाले यांनीच शहरातील रूग्णालयांच्या बांधकाम परवानगीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. रूग्णालयांचे बांधकाम, त्यातील पार्किंग व अन्य गरजेच्या गाष्टींचे पालन केले जाते की नाही, मंजूर आराखडय़ानुसार बांधकाम केले जाते की नाही, अनेक ठिकाणी निवासी जागेतच रूग्णालये सुरू आहेत आदी गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधून याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले, मात्र यातील बहुसंख्य प्रश्नांवर प्रशासन निरूत्तर होते. याबाबत डागवाले यांच्यासह सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थायी समितीच्या पुढील नियमीत सभेत याबाबतचा सगळा तपशील सादर करण्याचा आदेशही डागवाले यांनी दिला.
मनपाचे मुख्य लेखापरीक्षक शेलार व समिती सदस्य दीप चव्हाण यांच्यामध्ये काही मुद्दय़ांवर आज चांगलीच खडाजंगी झाली. शेलार यांच्या उत्तरांनी संतप्त झालेल्या चव्हाण यांनी त्यांना सदस्यांशी सन्मानाने वागम्याची तंबीच दिली. सदस्यांचे शंकानिरसन झाल्याशिवाय चर्चा संपणार नाही असेही त्यांनी खडसावले. आरोग्य विषयावरील चर्चेत अनेक नकारात्म गोष्टीच पुढे आल्या. एलबीटीच्या चर्चेत सदस्यांनी शहरातील घटत्या उत्पनाबाबत नाराजीच व्यक्त केली. तसेच मनपाच व्यापारी संकुलांधील गाळ्यांबाबतही प्रशासन समादानकारक माहिती देऊ शकले नाही. मनपाचे शहरात सुमारे ८५३ व्यापारी गाले असून तेथील अन्य व्यवस्था, त्याची भाडेवसुली याबाबात सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा