तानाजी काळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंदापूर : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे गावोगावच्या यात्रा-जत्रांच्या हंगामातील बंद पडलेले कुस्त्यांचे जंगी आखाडे आता पुन्हा गजबजू लागले आहेत. कुस्त्यांचे आखाडे सुरू झाल्याने कुस्ती शौकीन आणि पैलवानांमधून आनंद व्यक्त होत आहे. महाशिवरात्रीपासून महाराष्ट्रामध्ये यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू होतो. चैत्र महिन्यात मोठय़ा प्रमाणात यात्रा असतात. गावोगावच्या जत्रांचे प्रमुख आकर्षण असलेले कुस्त्यांचे आखाडे कुस्ती शौकिनांची गर्दी खेचत असतात. या आखाडय़ामध्ये वर्षभर महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील तालमीत प्रशिक्षण घेतलेले अनेक मल्ल आपले कसब पणाला लावून कुस्ती खेळतात. दरवर्षी कुस्ती आखाडय़ात लोक वर्गणीतून जमा झालेल्या रकमेतून लाखो रुपयांची उलाढाल होते. कुस्ती मधून मिळालेल्या रकमेचा हातभार पैलवानांना दैनंदिन खर्चासाठी लागतो.

‘यंदा पुन्हा नव्या जोमाने जत्रांचा हंगाम सुरू झाला असून आखाडे सुरू झालेले आहेत.  सलग दोन वर्ष जत्रा भरल्या नसल्याने वर्गणी गोळा करता आली नाही. यंदाही कोणत्याही प्रकारची वर्गणी न वाढविता गेल्या दोन वर्षांच्या वर्गणीनुसार ऐच्छिक वर्गणी गोळा करण्यात आली. त्याचबरोबर सलग दोन वर्ष कुस्त्यांचे आखाडे बंद असल्यामुळे पैलवानांना थोडाफार मदतीचा हातभार असावा म्हणून, अन्य खर्चाला फाटा देऊन बऱ्यापैकी रक्कम कुस्त्यांच्या इनामावर आम्ही खर्च केली,’ असे डाळज तालुका इंदापूर येथील पीरसाहेब यात्रा कमिटीचे प्रमुख डी. एन. जगताप यांनी सांगितले.

खेळ जतनासाठी..पैलवान रावसाहेब मगर हे सोलापुरातील कुस्ती क्षेत्रातील मोठे नाव. आजही त्यांच्या तालमीमध्ये मल्लविद्या प्रशिक्षण घेतलेले अनेक नामवंत मल्ल महाराष्ट्रभर आपले नैपुण्य दाखवतात. कुस्ती क्षेत्र टिकावे, गावोगावी आखाडे भरावेत, कुस्तीला राजाश्रय मिळावा आणि गावोगावी चांगली मुले पैलवान तयार व्हावीत, या हेतूने गेली २४ वर्ष पै. रावसाहेब मगर महाराष्ट्राच्या विविध भागात कुस्ती आखाडय़ांत जत्रांच्या हंगामात फिरतात. गावच्या कुस्ती आखाडय़ाचे आयोजक, प्रमुख पंच यांना मगर हे फेटा बांधून खऱ्या अर्थाने तांबडय़ा मातीचा सेवा केल्याबद्दल त्यांचा सन्मान करतात. यंदा २९०१ वा मानाचा फेटा डाळे येथील कुस्ती आखाडय़ात डी. एन. जगताप यांना बांधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrestling arenas villages background coronavirus infection ysh