|| कल्पेश भोईर

दोन वर्षांपासून स्पर्धा होत नसल्याने कुस्ती पैलवानांचा हिरमोड

वसई : पालघर जिल्ह्यसह वसईच्या ग्रामीण भागात साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवात कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित केले जातात. मात्र करोनाच्या संकटामुळे यंदा गावोगावच्या यात्रा रद्द झाल्याने आपसूकच कुस्त्यांचे जंगी सामनेसुद्धा रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे दरवर्षी कुस्त्यांच्या जंगी सामन्यांनी रंगणारे कुस्त्यांचे आखाडे हे मागील दोन वर्षांपासून रिकामी राहिले आहेत.

वसई पूर्वेतील ग्रामीण भागात उन्हाळ्यात भरणाऱ्या यात्रोत्सवांत कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्याची परंपरा जुनी आहे. विशेषत: वसई पूर्वेतील शिरवली, पारोळ, जुचंद्र, भिनार, मालजीपाडा याठिकाणी यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचे सामने भरविले जातात. कुस्त्यांचे सामने म्हटले की विविध ठिकाणचे कुस्ती पैलवान आधी आखडय़ाची वाट धरतात. तर दुसरीकडे कुस्तीप्रेमी रसिक भर उन्हात थांबून कुस्ती स्पर्धा पाहिल्याशिवाय  घरचा रस्ता धरत नाहीत. मातीच्या आखाडय़ात नामांकित पैलवान उतरल्यावर त्यांची कुस्ती बघणं हा कुस्ती रसिकांसाठी मोठा आनंदच असतो.

कुस्ती पैलवान हे प्रचंड मेहनत करून कुस्ती जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. त्यातून मिळणाऱ्या बक्षिसांमुळे पैलवान आनंदाने आपल्या घरी परततो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या महामारीने गावोगावी भरणारे यात्रोत्सव रद्द झाल्याने अनेक वर्षांची कुस्ती स्पर्धाची परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे कुस्ती पैलवान व रसिकांचा हिरमोड झाला आहे.

कुस्ती स्पर्धामुळे खरंतर आम्हाला ओळख मिळते. अनेक ठिकाणी स्पर्धा असली की त्याठिकाणी चांगले खेळलो तर चांगली पारितोषिकेदेखील मिळतात. त्यामुळे निदान काही दिवसांचा खर्च त्या मिळणाऱ्या रकमेतून सुटतो. पण दोन वर्षांपासून कुठेच स्पर्धाच नसल्याने थोडी निराशा असल्याचे कुस्ती पैलवान सोपान यांनी सांगितले आहे.

दरवर्षी यात्रोत्सवाच्या निमित्ताने भरविलेल्या कुस्ती स्पर्धा या आमच्यासाठी मोठी पर्वणी असते. आपल्यातील खेळाचे प्रदर्शन दाखविण्यासोबतच कुस्ती रसिकांचे  मन जिंकण्यासाठी प्रयत्न करतो. चांगले खेळून हरल्यानंतरही काही कुस्तीरसिक पारितोषिके देऊन मनोबल वाढवितात. मात्र दोन वर्षांपासून कुठेच स्पर्धा नसल्याने हिरमोड झाला आहे.

– विपुल हरड, कुस्ती पैलवान

 

कुस्त्यांचे सामने म्हणजे आमच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट असते. वेळात वेळ काढून सामने पाहण्यासाठी आम्ही स्पर्धेचे ठिकाण गाठतो. करोनामुळे आता सर्व रद्द झाले आहे. कधी पुन्हा सर्व काही सुरळीत होऊन कुस्त्यांचे सामने भरतील याची वाट पाहात आहोत.

– कमलाकर जाधव, कुस्ती प्रशिक्षक

Story img Loader