मराठी साहित्यातील जेष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे रविवारी सकाळी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. निधनासमयी ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. मराठी साहित्याची परखड, पारदर्शी समीक्षा करीत त्यांनी अनेक नवसाहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला होता.
हातकणंगलेकर यांच्यावर सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निधन झाले. दुपारी सांगलीच्या कृष्णाकाठी असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. या वेळी माजी महापौर सुरेश पाटील, माजी आ. प्रा. शरद पाटील, साहित्यिक प्रा. राजन गवस, प्रा. डॉ. मोहन पाटील, समीक्षक वैजनाथ महाजन, वसंत केशव पाटील, अविनाश टिळक, महेश कराडकर, नामदेव माळी, भीमराव धुळूबुळू, नामदेव भोसले, डॉ. दिलीप िशदे आदी साहित्य व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शनिवारी मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.    
हातकणंगलेकर यांनी सांगलीच्या वििलग्डन महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापक म्हणून काम केले होते. इंग्रजी वाचनाबरोबरच त्यांनी मराठी वाचनाचा व्यासंग जोपासला होता. त्यांची साहित्यातील अधोरेखिते, मराठी साहित्य प्रेरणा आणि प्रवाह, निवडक मराठी समीक्षा, मराठी कथा लय व परिसर, साहित्य विवेक, आठवणीतील माणसे, भाषणे आणि परीक्षणे, जी. एं. ची निवडक पत्रे खंड १ ते ४, वाङ्मयीन शैली व तंत्र, ललित शिफारस आणि साहित्य सोबती आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साहित्यातील सौंदर्यशास्त्र, समीक्षा, कथा कविता यांची समीक्षा आदीबाबत त्यांच्या व्यासंगी लेखांचा संग्रह साहित्यातील अधोरेखीते या पुस्तकात पाहण्यास मिळतो. म. द. चीं समीक्षा म्हणजे एक मापदंड असल्याची भावना मराठी साहित्य क्षेत्रात मानली जाते.
सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला होता. त्यांना सांगलीभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले होते.   

Story img Loader